मुंबई : सुसंस्कृत लोकही सामाजिक अंतरासंबंधातील नियम आणि कोविड-१९ चा संसर्ग होऊ नये, यासाठी बनविण्यात आलेल्या नियमांचे पालन करत नाहीत. मग भिकाऱ्यांनाच दोष देणे योग्य नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले.पुण्याचे रहिवासी ज्ञानदेश्वर दारवटकर यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने वरील निरीक्षण नोंदविले.
सामाजिक अंतराचे नियम भिकारी पाळत नसून ते लोकांकडे भीक मागण्यासाठी येताना तोंडाला मास्क घालत नाहीत. त्यांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता जास्त आहे. अनेक महिला आणि लहान मुले रस्त्यावर भीक मागत असतात. राज्य सरकारला यासंबंधी आवश्यक ती खबरदारीची पावले उचलण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी याचिकेत आहे.
संपूर्ण देश कठीण काळातून जात आहे आणि या स्थितीत केवळ भिकाºयांना लक्ष्य करणे योग्य नाही. संवेदनशीलता दाखवा, असे न्यायालयाने म्हटले. केवळ भिकाºयांना का दोष द्या? सुसंस्कृत लोकही सामाजिक अंतराचे व अन्य नियम पाळत नाहीत, असे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने यावर राज्य सरकार व पुणे महापालिकेला उत्तर देण्याचे निर्देश देत या याचिकेवरील सुनावणी १४ आॅगस्ट रोजी ठेवली.