‘आयाराम’च्या दावेदारीने अस्वस्थता
By admin | Published: January 29, 2017 03:44 AM2017-01-29T03:44:01+5:302017-01-29T03:44:01+5:30
‘सरशी तिथे पारशी’ अशी काहीशी स्थिती महापालिका निवडणुकीत दिसून येत आहे. आजच्या घडीला फॉर्मात असलेल्या भाजपाला अन्य पक्षांतील नाराजांची पहिली पसंती मिळत आहे,
मुंबई : ‘सरशी तिथे पारशी’ अशी काहीशी स्थिती महापालिका निवडणुकीत दिसून येत आहे. आजच्या घडीला फॉर्मात असलेल्या भाजपाला अन्य पक्षांतील नाराजांची पहिली पसंती मिळत आहे,
तर काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण पेटले असल्याने तिथले नाराज शिवसेनेकडे वळले आहेत. ‘मिशन १००’ गाठण्यासाठी अशा कुमकची गरज असल्याने अन्य पक्षांतील वजनदारांना पक्षात खेचून आणण्याची रणनीती भाजपाने आखली आहे. मात्र तिकिटाच्या आशेवर पक्षात आलेल्या
या ‘आयाराम’मुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते बिथरले आहेत.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा भाजपाला झाला. या यशामुळे स्वबळावर महापालिकेत सत्ता स्थापनेची स्वप्ने भाजपाला
पडू लागली. आपल्याच पक्षाचा महापौर निवडून आणण्याचे
भाजपाने लक्ष्य ठेवले आहे. मात्र सत्तेसाठी ११४ संख्याबळ असणे आवश्यक आहे. त्यामुळे हा मॅजिक फिगर गाठण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली आहे. त्यानुसार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाला कार्यकर्त्यांची कुमक हवी आहे. ही फौज भाजपाला अन्य पक्षांतून आयात करावी लागणार आहे. यासाठी अन्य पक्षांतील नाराजांना तिकिटांचे प्रलोभन दाखवण्यात येत आहे.
नाराज नेते स्वत:बरोबर समर्थकांची कुमकही पक्षात आणणार असल्याने भाजपाच्या प्रचाराला बळ मिळेल. त्याचबरोबर विजयाची खात्री असलेल्या अन्य पक्षांतील इच्छुकाला खेचून आपले पारडे जड करण्याचे भाजपाचे डावपेच आहेत. शिवसेनाही इतर पक्षांतून आलेल्या उमेदवारांना तिकीट देण्याच्या विचारात असल्याने पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे. तरीही उमेदवारांची यादी जाहीर होईपर्यंत अनेकांनी सबुरीचा मार्ग स्वीकारला आहे. (प्रतिनिधी)
कार्यकर्ते दाखवतील आपली ताकद
पक्ष नेतृत्वाने दिलेल्या आदेशांचे निमूटपणे पालन करणारे प्रामाणिक कार्यकर्ते प्रत्येक पक्षात असतात. मात्र अन्य पक्षातील बंडखोरांसाठी या कार्यकर्त्यांना डावलल्यास पक्षात राहूनच ही मंडळी असहकार पुकारतील, अशी नाराजी काही जण खासगीत व्यक्त करीत आहेत.
भाजपाला हवी कार्यकर्त्यांची फौज
युतीत भाजपाच्या वाट्याला फार कमी जागा येत होत्या. २०१२ च्या निवडणुकीत भाजपाचे ३१ नगरसेवक निवडून आले. २००७ मधील निवडणुकीच्या तुलनेत हे संख्याबळ अधिक आहे. मात्र ‘मिशन १००’ म्हणजे स्वबळावर १०० नगरसेवक निवडून आणण्यासाठी ही कुमक पुरेशी नाही. अशा वेळी अन्य पक्षांतून आलेल्या नेत्यांचे समर्थक मतदारांपर्यंत पोहोचण्यास फायदेशीर ठरतील, अशी आशा भाजप नेत्यांना आहे.
कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता : निष्ठेने पक्षाचा झेंडा उचलून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कधी तरी या कामाचा मोबदला मिळण्याची आशा असते. अशा काही निष्ठावंतांना लॉटरीचे हे तिकीट लागले आहे. मात्र अन्य पक्षांतून आलेल्या आयाराममुळे पक्षाचे मूळ कार्यकर्ते दुर्लक्षित राहिले. यंदा २५ वर्षांची युती तुटल्यामुळे सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे आयारामांचे पारडे जड असल्याने अनेक इच्छुक कार्यकर्त्यांचा ‘पत्ता कट’ होण्याची चिन्हे आहेत.
भाजपातील ‘इनकमिंग’
मनसेचे प्रकाश दरेकर, काँग्रेसचे सागर सिंह ठाकूर, परमिंदर सिंग भामरा, शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश नाईक, लीना शुक्ला, मनसेचे भालचंद्र आंबुरे तसेच मनसेचे माजी आमदार मंगेश सांंगळे, काँग्रेसचे माजी आ. कृष्णा हेगडे, शिवसेनेचे सुनील गणाचार्य.
सेनेतील ‘इनकमिंग’
राष्ट्रवादीच्या रिद्धी खुरसुंगे, संध्या दोशी, काँग्रेसचे भौमसिंग राठोड, समाजवादी पार्टीतील खान