Join us

हत्या केली; पण बांगड्या नाही चोरल्या! ज्योती शहा हत्याप्रकरणातील आरोपीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 9:56 AM

अन्यत्र चोरीचे प्रयत्न फसले.

मुंबई : ज्योती शहा यांच्या हत्याप्रकरणात भुसावळमधून अटक करण्यात आलेला कन्हैयाकुमार संजय पंडित याने शहा यांच्या तीन लाखांच्या हिरेजडित बांगड्या चोरी केल्या नसल्याचे सांगितले. चोरीच्या उद्देशाने बेडरूममध्ये गेलो. मात्र, शहा यांना जाग आल्याने त्यांची गळा दाबून हत्या करून पसार झाल्याचे पोलिसांना सांगितले. या बांगड्यांचे नेमके काय झाले? याबाबत पोलिस कसून चौकशी करीत आहेत. 

मलबार हिल तानी हाईट्समध्ये राहणाऱ्या शहा कुटुंबीयांकडे एक दिवसापूर्वीच कामाला लागलेला कन्हैया चार महिन्यांपूर्वीच मुंबईत परतला होता. यापूर्वी येथील इमारतीतील अन्य दोन कुटुंबांकडे नोकरी केली. शहा यांच्या नातेवाइकांकडेही १५ ते २० दिवस नोकरी केली. मात्र, तेथे घरात कोणी ना कोणी असल्याने त्याला चोरीची संधी मिळाली नाही. मुकेश आणि त्यांची मुलगी दुकानावर गेल्यानंतर ज्योती एकट्या राहत असल्याने त्याने दुसऱ्या दिवशीच चोरीचा डाव आखला. ठरल्याप्रमाणे शहा दुपारी दोन वाजता झोपण्यासाठी जाताच अर्ध्या तासाने बेडरूममध्ये गेला. 

शोध सुरू असताना शहा यांना जाग आल्याने गळा दाबून त्यांची हत्या करून पसार झाला. घटनेनंतर, अपर पोलिस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलिस उपायुक्त संजय लाटकर, सहायक पोलिस आयुक्त विनायक मेर यांच्या मार्गदर्शनाखाली १५  पथके तैनात करत आरोपीला बेड्या ठोकल्या.

तो कॉल अखेरचा ठरला :

ज्योती या नेहमी दुपारी दोन वाजता झोपायला जाण्यापूर्वी नियमित बहिणीला किंवा मुलीला कॉल करायच्या. घटनेच्या दिवशीही झोपण्यापूर्वी बहिणीला फोन केला. मात्र, त्यांनी फोन घेतला नाही. सायंकाळी चार वाजता बहिणीने कॉल केला मात्र तोपर्यंत शहा यांचा मृत्यू झाला होता.  

हत्येनंतर यार्डमध्येच झोपला... 

हत्येनंतर कन्हैया कॉर्नरवर टॅक्सीने कुर्ला स्टेशनवर आला. तेथील यार्डमधील एका ट्रेनमध्ये झोपला. त्यानंतर, रात्री गरीबरथच्या प्रवासादरम्यान रात्री दीडच्या सुमारास अन्य प्रवाशाच्या मोबाइल क्रमांकावरून त्याने वडिलांना फोन केला. पोलिसांनी हाच धागा पकडून तपास सुरू केला. 

स्टेशन आले की टॉयलेटमध्ये लपायचा :

सहप्रवाशाच्या मोबाइल लोकेशननुसार पोलिसांनी रेल्वे पोलिसांना अलर्ट केले. तो भुसावळला पोहोचल्याचे समजताच, तो रसोलला जाणाऱ्या गाडीत असल्याच्या शक्यतेतून पोलिसांनी शोध घेतला. पोलिसांना पाहून तो रेल्वेच्या टॉयलेटमध्ये लपला. पोलिस गेल्याची खात्री होताच बाहेर निघाला. मात्र, साध्या गणवेशातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस