कल्याण : घनकचऱ्याच्या मुद्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने केडीएमसीला फटकारल्यानंतर आता न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील महापालिकेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त दिपक पाटील, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे प्रमुख तथा उपायुक्त संजय घरत आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांविरोधात कल्याण न्यायालयात शुक्रवारी दावा दाखल करण्यात आला आहे.आधारवाडी डंपिंगची क्षमता संपुष्टात आल्याने यापुर्वीच तेथे कचरा टाकण्यास महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानेही नोटीस बजावून मनाई केली होती. तरीही आजतागायत या डंपिंगचा वापर सुरूच आहे. कचरा डंपिंगच्या मुद्यावर दाखल याचिकेवर १३ एप्रिलला झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने केडीएमसीला फटकारले. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. त्यानूसार पालिकेच्या तीन अधिकाऱ्यांविरोधात दावा दाखल केल्याची माहीती महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ कल्याण शाखेचे अधिक्षक अभियंता जितेंद्र संगेवार यांनी दिली. विशेष म्हणजे ज्या अधिकाऱ्यांविरोधात दावा दाखल करण्यात आला आहे त्यातील पाटील आणि रोडे यांनी नुकतेच संबंधित खात्यांचे पदभार स्वीकारले आहेत. (प्रतिनिधी)
केडीएमसीच्या तिघा अधिकाऱ्यांंविरोधात दावा दाखल
By admin | Published: April 24, 2015 10:52 PM