मुंबई : पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी भारतात येऊ इच्छितो. मात्र, त्याच्या जीवाला धोका आहे. त्याला ठार मारतील, असा दावा मोदीच्या वकिलांनी विशेष न्यायालयात शनिवारी केला. तसेच नीरव मोदी फरार झाल्याचा आरोपही त्यांनी फेटाळला.नीरव मोदी १ जानेवारी २०१८ ला परदेशात गेला. जानेवारी अखेरीस पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदविला. त्यामुळे त्याला ‘फरार’ म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद मोदी याच्या वकिलांनी विशेष न्यायालयात केला.मोदी भारतात येऊ इच्छितो. परंतु, त्याचे मॉब लीचिंग होऊ शकते, अशी त्याला भीती असल्याचेही त्याच्या वकिलांनी सांगितले. नीरव मोदीचे परदेशातही व्यवसाय असल्याने तो नियमित परदेशी जातो. त्यासाठी त्याच्याबरोबर व्हिसा, पासपोर्ट घेऊन गेले आहेत. तसेच मोदीची कार्यालये, शोरूम, फ्लॅटचा ताबा ईडीने घेतला आहे. सर्व मुख्य कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. सर्व महत्त्वाची कागदपत्रे तपासयंत्रणेकडे असल्याने न्यायालयात कागदपत्रे सादर करू शकत नाही, असे मोदीच्या वतीने त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.>पुढील सुनावणी ५ डिसेंबरलापंजाब नॅशनल बँकेचे १३,५०० कोटी रुपये कर्ज बुडविल्याचा आरोप नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोक्सी याच्यावर आहे. पोलिसांनी या दोघांवरही २६ मे रोजी दोषारोपपत्र दाखल केले. या दोघांवरही अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी ५ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.
भारतात नीरव मोदीच्या जीवाला धोका असल्याचा वकिलांचा विशेष न्यायालयात दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 6:13 AM