मुंबई : दहावीची परीक्षा दिलेल्या कलमापन व अभिक्षमता चाचणी निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून, या चाचणी अहवालात सर्वाधिक १९.३ टक्के विद्यार्थ्यांनी गणवेशधारी सेवेत जाण्याकडे कल आहे. तर, १७.७ टक्के विद्यार्थ्यांचा कल हा ललित कला क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. कलमापन चाचणी बरोबरच कल अभिक्षमता चाचणीचा अहवाल शुक्रवारी १ मे रोजी www.mahacareermitra.in या पोर्टलवर दुपारी १ वाजल्यापासून उपलब्ध करून दिला आहे.राज्यातील २२ हजार ४८८ शाळांमधून इयत्ता दहावीच्या १५ लाख ७६ हजार ९२६ विाद्यार्थ्यांची कल अभिक्षमता चाचणी मोबाइल आणि कम्प्युटरच्या माध्यमातून घेण्यात आली. कृषी, कला-मानव्यविद्या, वाणिज्य, ललित कला, आरोग्य व जैविक विज्ञान, तांत्रिक आणि गणवेशधारी सेवा या सात क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे कल जाणून घेण्यात आली. यात २० टक्के मुलांचा पहिला प्राधान्य कल गणवेशधारी सेवेकडे आहे, तर १९.८ मुलींचा पहिला प्राधान्य कल ललित कला या क्षेत्राकडे असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये १६.८ विद्यार्थ्यांनी वाणिज्य क्षेत्राकडे दुसरे प्राधान्य दिले आहे. १६.१ मुलींचे तांत्रिक आणि १६ टक्के वाणिज्य ही दुसरी प्राधान्य असलेली कल क्षेत्रे आहेत. राज्यातील ९ विभागांपैकी ६ विभागांमध्ये गणवेशधारी सेवा आणि २ विभागांमध्ये ललित कला या क्षेत्राला पहिले प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्रातील ९ पैकी ८ विभागामध्ये वाणिज्य या कल क्षेत्राला सर्वाधिक दुसऱ्या क्रमांचे प्राधान्य दर्शविते, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून प्चेरसिद्धीस दिलेल्या माहिती पत्रकातून देण्यात आली आहे.
कलमापन व अभिक्षमता चाचणी निकाल जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 7:09 PM