मुंबई: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. मात्र या शेवटच्या दिवशी शिंदे गटातील मतभेद समोर आल्याचे दिसून येत आहे. विधानसभेच्या लॉबीत बोलताना मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.
मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात वाद झाला. हा वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहचला. त्यावेळी मंत्री शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटल्याचं बोलले जाते. याचपार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधत या घटनेची सविस्तर माहिती देत महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यात कोणताही वाद झालेला नाही, असं सांगितले.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात कोणताही वाद झालेला नाही. दोघांमध्ये काहीही झालेलं नाही. बोलताना फक्त आवाज वाढला म्हणून वाद झाला असं होत नाही. एका कामाबाबत दादा भुसेंसोबत बोलताना महेंद्र थोरवे यांचा आवाज वाढला, असं मला समजलं. त्यामुळे मी महेंद्र थोरवे यांना बाजूला घेऊन संवाद साधला. महेंद्र थोरवे यांचं त्यांच्या मतदारसंघातील काम होतं, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. धक्काबुक्की झाली याचा काही पुरावा आहे का?, असा सवालही मंत्री शंभूराज देसाई यांनी उपस्थित केला.
समज गैरसमज असतात- प्रताप सरनाईक
दादा भुसे यांच्याशी बोललो, समज गैरसमज असतात. मतदारसंघातील काम विचारायला गेले तेव्हा चर्चा होत असते. दादा भुसे हे मंत्री आहेत. ते दिघेंपासून एकनिष्ठ आहेत. आमदार ही व्यक्तीच असते. सभागृहाच्या बाहेर घडलेल्या घटनांशी गोळीबाराशी तुलना करणे योग्य नाही. धक्काबुक्की झाली नाही. आचारसंहिता लागण्यापूर्वी काम करून द्या यासाठी आमदार आग्रही होते. ज्यावेळी असे प्रकार घडले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे असं आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.