रेल्वे प्रवाशांमध्ये हाणामारी
By admin | Published: April 18, 2016 02:03 AM2016-04-18T02:03:54+5:302016-04-18T02:03:54+5:30
ट्रेनसाठी रांगेत उभे असताना शनिवारी रात्री लोकमान्य टिळक टर्मिनस येथे काही प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली. यामध्ये काही जण जखमी झाले आहेत. आरपीएफने याबाबत गुन्हा
मुंबई : ट्रेनसाठी रांगेत उभे असताना शनिवारी रात्री लोकमान्य टिळक टर्मिनस येथे काही प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली. यामध्ये काही जण जखमी झाले आहेत. आरपीएफने याबाबत गुन्हा दाखल करत सहा जणांना अटक केली आहे.
शाळेला सुटी पडल्याने सर्वच जण सध्या गावाला जाण्याच्या तयारीत आहेत. रेल्वे मध्ये आरक्षण मिळत नसल्याने सर्वसाधारण बोगीनेच अनेक जण प्रवास करीत आहेत. जागा मिळविण्यासाठी यासाठी रात्रभर रांग लावावी लागते. अशाच प्रकारे लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रविवारी गोदावरी एक्स्प्रेसने जाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. रविवारी सकाळी ११ वाजता ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणार होती. त्यामुळे शनिवार रात्रीपासूनच स्थानकावर प्रवाशांनी रांग लावली होत्या. दरम्यान, एक प्रवासी रांगेत शिरल्याने काहींनी त्याला जाब विचारला. यावरून पहिल्यांदा या प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली. मात्र काही वेळानंतर या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. स्थानकावर एकही पोलीस नसल्याने हा राडा बराच वेळ या ठिकाणी सुरू होता. अखेर काही वेळानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर हाणामारी करणाऱ्या सहा प्रवाशांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. (प्रतिनिधी)