मुंबईतून ३,९१,१९१ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा, आजपासून परीक्षेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 05:53 AM2020-03-03T05:53:21+5:302020-03-03T05:53:25+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावीची परीक्षा आजपासून (मंगळवार) सुरू होत असून, मुंबई विभागातून ३ लाख ९१ हजार १९१ विद्यार्थी ही परीक्षा देतील.
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावीची परीक्षा आजपासून (मंगळवार) सुरू होत असून, मुंबई विभागातून ३ लाख ९१ हजार १९१ विद्यार्थी ही परीक्षा देतील. ठाणे, पालघर, रायगड, मुंबई व मुंबई उपनगर या विभागांमधून एकूण १,०२४ परीक्षा केंद्रांवर भरारी पथके आणि अत्याधुनिक यंत्रणांच्या निगराणीखाली परीक्षा पार पडेल, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुंबई सचिव संदीप सांगवे यांनी दिली.
राज्यातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी ही परीक्षा देतील. यातील ९ हजार ४५ दिव्यांग आहेत, असे मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितले. तसेच केंद्रावर मोबाइल बंदी असून अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
हातमोजे वापरण्याची मुभा
हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलमधील सिद्धार्थ जया पलन या विद्यार्थ्याला मुंबई विभागीय मंडळाने पांढरे हातमोजे वापरण्याची परवानगी दिली. त्याला हायपर हायड्रोसिस आजार असल्याने त्याच्या हाताला घाम येतो. त्यामुळे उत्तरपत्रिका लिहिताना त्रास होऊ नये, उत्तरपत्रिका खराब होऊ नये, यासाठी ही परवानगी दिल्याचे सांगवे म्हणाले. त्याला २० मिनिटे ज्यादाची सवलतही दिली आहे.
>मुंबई विभाग हेल्पलाइन
०२२-२७८९३७५६/ २७८८१०७५
मुंबई विभागातील विद्यार्थी संख्या
3,91,191
विशेष विद्यार्थी
2,795
परीक्षा केंद्रे
1,024