मुंबई : राज्यातील शाळांमधील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग येत्या २७ जानेवारीपासून सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिले. या संबंधीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जारी करण्यात येतील असे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.
शालेय शिक्षण विभागाच्या ‘व्हिजन २०२५’चे सादरीकरण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत करण्यात आले. शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा प्रस्ताव विभागाने मुख्यमंत्र्यांकडे दिलेला होता. त्याला मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले. बैठकीनंतर वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, हे वर्ग सुरू करताना यासाठी पालकांची संमती घेतली जाईल. संसर्गापासून बचावासाठी खबरदारी म्हणून सगळ्या शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग आधीच सुरू करण्यात आलेले आहेत. आता कोरोनाबाबतच्या सर्व मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्गही सुरू करण्यात येतील.
मुंबईतील शाळांना पुढील आदेशापर्यंत टाळेच
मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला, तरीही अन्य देश व राज्यांतील स्थिती पाहता मुंबई पालिका क्षेत्रातील सर्व शाळा व शैक्षणिक संस्था पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले. यासंबंधी मुंबई पालिका शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
पालिकेच्या शिक्षण विभागाने १८ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला होता. यानुसार मुंबईतल्या नववी ते बारावीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता होती. मात्र आधीचाच शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. लसीकरण मोहिमेसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलल्याची चर्चा आहे. काही शाळा लसीकरण केंद्र म्हणून वापरण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, अद्याप असा निर्णय झाला नसल्याची माहिती पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. तर कमीतकमी ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करायला हवे होते, अशी प्रतिक्रिया मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी दिली.