लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्राच्या सूचनांप्रमाणे देशाच्या अनेक भागांतील शाळा २१ सप्टेंबरपासून अंशत: सुरू झाल्या असल्या तरी राज्यातील शाळांना मात्र शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतिक्षा आहे. अनेक राज्य व इतर मंडळाच्या खासगी शाळांनीही राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्राकडून सूचना आल्या असल्या तरी शालेय शिक्षण विभागाच्या सूचना कशा आणि कधी येणार याची वाट पाहणे विद्यार्थी सुरक्षिततेच्या हिताचे असल्याचे मत व्यक्त केले आहे.
त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या सूचना मिळाल्यानंतर काय खबरदारी घ्यायची? काय नियम पाळायचे याची तयारी शाळांनी केली असली तरी सध्यस्थितीत आॅनलाइन शिक्षणच सुरू राहणार असल्याची माहिती शहरांतील शाळा आणि त्याच्या व्यवस्थापनांनी, शिक्षकांनी दिली आहे.महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता शाळा सुरू करता येणार नसल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार २१ सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या हालचाली शाळांकडून आणि व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहेत. केंद्राकडून जरी ५० टक्के शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे निर्देश असले तरी आम्ही त्याबाबतीतही शिक्षण विभागाच्या सूचनांची वाट पाहत असल्याची महिती ऐरोलीच्या युरो स्कूलच्या मुख्याध्यापिका सुदेशना यांनी दिली. शाळा सुरू झाल्यावर वर्गातील बैठकीपासून ते स्वच्छतागृहातील वावर यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग कशी राहील याकडे आमचा कार्यबल गट कार्यरत राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याच प्रकारे मुंबई उपनगरातील एका मराठी शाळेच्या मुख्याध्यापकांनीही शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना मिळाल्यास विद्यार्थी, पालकांमधील संभ्रम दूर करता येईल अशी प्रतिक्रिया दिली.शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांना सद्यस्थितीत बोलावणे अवघड आहे. मात्र विभागाकडून पुढील शैक्षणिक वर्षाविषयी नियोजनाच्या सूचना दिल्यास तशी तयारी करता येईल असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान दिवाळीनंतर शाळा सुरू करायची झाल्यास शाळांच्या इमारतींचे निर्जंतुकीकरण करणे, साफसफाई, गेटवरील थर्मल स्क्रीनिंग सगळ्याची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान केंद्राच्या निर्देशांप्रमाणे ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करता येतील. चाचपणी शिक्षण विभागाकडून करण्यात आली. मात्र महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या बघता २१ सप्टेंबरपासून शाळा सुरू करणे योग्य नाही, अशी भूमिका शुक्रवारच्या आॅनलाइन बैठकीत संस्थाचालकांनी मांडलीय. दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा, अशीदेखील मागणी केली.बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्याच्या शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण संचालक दिनकर पाटील, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, युनिसेफच्या रेशमा अग्रवाल यांच्यासह शिक्षण विभागातील विविध अधिकारी, शिक्षणाधिकारी उपस्थित होते.