चार रंगांच्या पिशव्यांमध्ये जैव वैद्यकीय कचऱ्याचेे वर्गीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 09:02 AM2022-03-07T09:02:46+5:302022-03-07T09:02:52+5:30

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या देखरेखीखाली कचऱ्यावर प्रक्रिया 

Classification of biomedical waste in four color bags | चार रंगांच्या पिशव्यांमध्ये जैव वैद्यकीय कचऱ्याचेे वर्गीकरण

चार रंगांच्या पिशव्यांमध्ये जैव वैद्यकीय कचऱ्याचेे वर्गीकरण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रुग्णालयीन घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार जैव वैद्यकीय कचऱ्याची चार गटांत वर्गवारी करण्यात आली आहे. या कचऱ्याच्या निर्मितीच्या ठिकाणीच या गटांमध्ये वर्गीकरण (सेग्रिगेशन) करणे हे कायद्याच्या कक्षेतील सर्व ठिकाणांना (रुग्णालये, दवाखाने,८ पशू-वैद्यकीय दवाखाने वा इतर आस्थापना) बंधनकारक आहे. असा वर्गीकरण केलेला कचरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या देखरेखीखाली सामायिक जैव वैद्यकीय प्रक्रिया व विल्हेवाट केंद्रात जातो. 

कचरानिर्मितीच्या प्रत्येक ठिकाणी वर्गीकरण करण्यासाठी चार विविध रंगांच्या विशिष्ट प्रकारच्या क्लोरिनमुक्त प्लास्टिकच्या पिशव्या/डबे वापरणे अनिवार्य आहे. कोणत्या रंगाच्या पिशवीत कोणत्या प्रकारचा जैव वैद्यकीय कचरा साठवावा यासंबंधी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत.

अशी असते रचना

पिवळ्या रंगाची पिशवी
शस्त्रक्रिया करून शरीरातून कॅन्सरची गाठ किंवा एखादा निकामी झालेला अवयव/भाग, प्रसूतीच्या वेळी मातेच्या शरीरातून बाहेर आलेली नाळ (प्लॅसेंटा) इ. भाग, रक्ताने माखलेले कापसाचे बोळे असा सर्व संसर्गजन्य आणि अतिशय घातक कचरा, तसेच मुदत संपून गेलेली औषधी वगैरे या पिशवीत गोळा करणे बंधनकारक आहे. प्रक्रियेदरम्यान ही पिवळी पिशवी एका मोठ्या भट्टीत अति उच्च तापमानाला जाळून टाकण्यात येते.

लाल रंगाची पिशवी
इंजेक्शनच्या सिरिंज, सलाइनच्या बाटल्या व नळ्या, तसेच इतर प्लास्टिकची उपकरणे या पिशवीत गोळा करणे बंधनकारक आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करताना हे सर्व प्लास्टिक ‘ऑटोक्लेव्ह’ नावाच्या ‘प्रेशर कुकर’च्या तत्त्वावर काम करणाऱ्या यंत्रात टाकून त्याचे १०० टक्के निर्जंतुकीकरण करण्यात येते. नंतर या प्लास्टिकचे बारीक तुकडे करण्यात येतात आणि हे तुकडे पुढे पुनर्चक्रीकरणास पाठविण्यात येतात.

पांढऱ्या रंगाची पिशवी
एकदा वापरून टाकून दिलेल्या सुया, ब्लेड्स यासारखी विविध प्रकारची तीक्ष्ण उपकरणे या पिशवीत जमा करावी लागतात. या उपकरणांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करून पुढे यांचे देखील पुनर्चक्रीकरण वा अन्य मार्गाने विल्हेवाट लावली जाते.

निळ्या रंगाची पिशवी
सर्व प्रकारच्या काचेच्या बाटल्यांचा कचरा यात साठवून, निर्जंतुकीकरण करून पुनर्चक्रीकरणासाठी पाठविण्यात येतो.

रुग्णालयात दररोज त्या-त्या विभागात रंगांच्या विभागणीप्रमाणे कचरा साठवण्यात येतो. ड्यूटीवरील सफाई कर्मचारी त्याचे वजन करून या पिशव्या सीलबंद करतात, त्यानंतर कचरा साठवणूक करीत असलेल्या ठिकाणी एकत्र केल्या जातात. रुग्णालयात दिवसाला १५० ते २०० किलो कचरा जमा होतो. याचे परीक्षण करण्याची जबाबदारी विभागाच्या मुख्य परिचारिकेवर असते. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महापालिकेच्या माध्यमातून खासगी कंत्राटदाराला दिली असून, दररोज या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते.
- नितीन नवले, जे. जे. रुग्णालयातील स्वच्छता विभाग

Web Title: Classification of biomedical waste in four color bags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.