Join us

शेअर्समध्ये गुंतवणुकीवर दुप्पट फायद्याचे आमिष अन् वर्गमित्रानेच गंडवले

By मनीषा म्हात्रे | Published: March 31, 2024 8:36 PM

यतीन गुडका याने सुरुवातीला सहा महिने कालावधीची गुंतवणूक योजना सांगत २५ लाख रुपये गुंतवणूक केल्यास त्यात दुप्पट फायदा मिळवून देण्याचे आश्वासन देत फसवणूक केली आहे.

मुंबई : मुलुंडमध्ये शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट फायदा मिळवून देण्याचे आमीष दाखवून वर्ग मित्राने व्यवसायिक मित्राची १५ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्यवसायिकाने दिलेल्या तक्रारीवरुन वर्ग मित्रासह त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा नोंदवत मुलुंड पोलीस अधिक तपास करत आहेत.

ठाण्यातील रहिवासी असलेला तक्रारदार व्यावसायिक पंकज शर्मा (४७) यांचा भांडुपमध्ये स्विच गिअर पार्टस मॅन्युफॅक्चरींगचा व्यवसाय आहे. शर्मा यांचा वर्गमित्र असलेला यतीन गुडका हा त्याची पत्नी मित्तल हीच्यासोबत त्यांना भेटायला यायचा. त्याने शेअर्स खरेदी-विक्रीमध्ये मोठा व्यापारी असल्याचे शर्मा यांना सांगितले होते. पुढे यतीन गुडका याने शर्मा यांना त्याच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगितले.

शेअर्स ट्रेडिंगबाबत कोणतीही माहिती नसल्याने शर्मा यांनी पैसे गुंतविण्यास नकार दिला. यतीन गुडका याने शर्मा यांना शेअर्स गुंतवणूकीबाबत वेळोवेळी माहिती देऊन गुंतवणूकीमधून जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. यतीन गुडका याने सुरुवातीला सहा महिने कालावधीची गुंतवणूक योजना सांगत २५ लाख रुपये गुंतवणूक केल्यास त्यात दुप्पट फायदा मिळवून देण्याचे आश्वासन देत फसवणूक केली आहे.

मित्रावर विश्वास ठेवून त्यांनी शर्मा यांनी १५ लाख २० हजार रुपये गुंतवणूक केली. शर्मा यांनी सहा महिन्यांनी त्याला विचारणा केली असता यतीन गुडका याने गुंतवणूकीची रक्कम तिप्पट झाली असल्याची माहिती दिली. त्याच्या बँक खात्याची स्टेटमेंट दाखवून तो शर्मा यांना आश्वासित करत होता. व्यवसायासाठी पैशांची आवश्यकता असल्याने शर्मा यांनी मे २०२० मध्ये यतीन गुडका याच्याकडे पैशांची मागणी केली. तेव्हा, गुडका याने सुरुवातीला काही धनादेश दिले. पण खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने हे धनादेश वठले नाही.

आपली फसवणूक होत असल्याचा शर्मा यांना संशय आला. त्यांनी केलेल्या चौकशीमध्ये यतीन गुडका आणि त्याच्या पत्नीने अशा प्रकारे आणखी सहा जणांची फसवणूक केल्याची माहिती त्यांना समजली. अखेर, शर्मा यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने मुलुंड पोलिसांनी गुडका विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.