Join us

...म्हणून मुंबई बुडली धुरक्यात; जाणून घ्या यामागील नेमकं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 1:32 PM

मुंबई शहर आणि उपनगरातील वाढत्या प्रदूषणाबाबत आवाज फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुलअली यांनी मुंबई महापालिकेला फेब्रुवारी महिन्यात पत्र लिहिले होते.

- सचिन लुंगसे

मुंबई : केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १० जानेवारी २०१९ रोजी राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ हवेचा कृती आराखडा राबविण्याबाबतचे निर्देश दिले होते. मात्र, मुंबईत स्वच्छ हवेच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी झाली नाही. प्रशासकीय यंत्रणांनी क्लीन एअर ॲक्शन प्लॅनची प्रभावी अंमलबजावणी केली असती तर मुंबई धुरक्यात बुडाली नसती.

मुंबईत जेव्हा हा निर्देशांक वर गेला तेव्हा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असे म्हणाले की "प्रत्येक शहराला ग्रेडड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनची अंमलबजावणी करण्यास सांगितले. मुंबई, उल्हासनगर, नवी मुंबई, बदलापूर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या शहरांना निर्देश दिले. मात्र प्लॅन काय नक्की काय आहे, पालिकेने त्याची अंमलबजावणी केली का? हे लोकांना माहीत नाही, असे वातावरण फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान केसभट यांनी सांगितले. दरम्यान, खराब हवेचा अंदाज महिन्यापूर्वीच आला होता. प्रदूषणाची आणीबाणी लागणार, हे प्रदूषण मंडळाला माहीत होते.

पालिकेने मार्गदर्शक सूचना द्याव्यात-

मुंबई शहर आणि उपनगरातील वाढत्या प्रदूषणाबाबत आवाज फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुलअली यांनी मुंबई महापालिकेला फेब्रुवारी महिन्यात पत्र लिहिले होते. या समस्येवर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत. नेमके काय करावे लागेल? अशा मार्गदर्शक सूचना महापालिकेने द्याव्यात, असे सुमेरा यानी पत्रात म्हटले होते. मात्र, पालिकेने अद्याप उत्तर दिलेले नाही.

...तरीही पालिकेकडून प्रतिसाद नाही-

महापालिकेने केंद्रीय मंत्रालयाला केवळ एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात वीज प्रकल्प आणि इंडस्ट्रीमधील प्रदूषण नियंत्रित करण्यात यावे, असे म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र वेगाने वाढणाऱ्या बांधकामांतून धूळ उठणार नाही. याबाबत पालिका काहीच कार्यवाही करत नाही. आवाज फाउंडेशनच्या पत्राला अकरा महिने झाले. मात्र, पालिकेकडून काहीच प्रतिसाद नाही. मुळात पालिकेला यावर कामच करायचे नाही की काय? त्यामुळे त्यांच्याकडून काहीच होत नसल्याचे फाउंडेशनकडून सांगण्यात आले.

२०२२ वर्षात कल्याण, मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथे २५० दिवस प्रदूषणाचे तर ११५ दिवस आरोग्यदायी होते. प्रा सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लानेट सोसायटी

मुंबई विभागात मागील ३६५ दिवसांपैकी २४७ दिवस कमी अधिक प्रदूषणाचे तर १०३ दिवस आरोग्यदायी होते तर १५ दिवसांची आकडेवारी उपलब्ध नाही.

  • १०३ दिवस प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी
  • १२६ दिवस समाधानकारक प्रदूषणाचे
  • ७४ दिवस जास्त प्रदूषणाचे आणि आरोग्यासाठी धोकादायक
  • ४४ दिवस अतिशय प्रदूषणाचे आणि आराम आरोग्यासाठी धोकादायक
  • ०३ दिवस हे हानिकारक प्रदूषणाचे आणि आरोग्यासाठी धोकादायक
टॅग्स :प्रदूषणहवामानमुंबई