स्वच्छ हवा मुंबईकरांसाठी ठरत आहे दिवास्वप्नच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 02:17 AM2020-03-04T02:17:48+5:302020-03-04T02:17:53+5:30
नवी मुंबईत २ दिवस वातावरण खराब तर २४ दिवस वातावरण अत्यंत खराब होते; तसेच १ दिवस खराब वातावरणाने तीव्रता गाठली होती.
सचिन लुंगसे
मुंबई : हिवाळा सरताना आणि उन्हाळा सुरू होतानाच फेब्रुवारी महिन्यातील १० दिवस मुंबईतील वातावरण खराब नोंदविण्यात आले. तर वांद्रे-कुर्ला संकुलात १९ दिवस वातावरण खराब आणि ५ दिवस अत्यंत खराब नोंदविण्यात आले. नवी मुंबईत २ दिवस वातावरण
खराब तर २४ दिवस वातावरण अत्यंत खराब होते; तसेच १ दिवस खराब वातावरणाने तीव्रता गाठली होती. मुंबई शहर आणि उपनगरातील वातावरण सातत्याने खराब नोंदविण्यात येत आहे. मुंबईतील वाढते प्रदूषण, वाढती वाहनांची संख्या, वाहनांतून हवेत सोडला
जाणारा धूर, कारखान्यांतून होणारे प्रदूषण, रस्ते आणि इमारत बांधकामांतून सातत्याने बाहेर पडणारे धूळीकण, विशेषत: विविध ठिकाणी
सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि त्यातून उठणारी धूळ प्राथमिकरीत्या येथील खराब हवामानास कारणीभूत आहे. रस्ते बांधकामातून धूळ उठू नये म्हणून महापालिका अथवा कंत्राटदार काहीच कार्यवाही करीत नाहीत. परिणामी, दिवसागणिक मुंबई शहर आणि उपनगरातील वातावरण खराब नोंदविण्यात येत आहे.
औद्योगिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हाती घेतलेल्या ‘स्टार रेटिंग प्रोगाम’ला प्रतिसाद मिळत असला तरी मुंबईत मात्र याबाबत पुरेशी जनजागृती झालेली नाही. हा उपक्रम डिजिटल आणि टेक्नोसॅव्ही असल्याने अधिकाधिक मुंबईकरांनी यात सहभागी होण्याची गरज आहे
हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण वाढत असून, मुंबईची हवा सातत्याने ‘वाईट’ नोंदविली जात आहे.
धूर, धुके आणि धूळ यांच्या मिश्रणातून तयार झालेल्या ‘धूरक्या’चा थर पाहण्यास मिळत आहे. मालाड, अंधेरी, बीकेसी, माझगाव आणि नवी मुंबई येथील हवेचा दर्जा घसरल्याची नोंद सातत्याने होत आहे.
शुद्ध हवेसाठी काय केले पाहिजे?
♦सरकारने धोरणे बदलली
पाहिजेत.
♦कार्बन उत्सर्जन कमी केले
पाहिजे.
♦सार्वजनिक वाहतुकीला
प्राधान्य दिले पाहिजे.
♦झाडे लावली पाहिजेत.
♦पर्यावरण जपले पाहिजे.
♦विकास करताना
पर्यावरणाची हानी होणार
नाही याची काळजी घेतली
पाहिजे.