मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषणाने कहर केला असताना काही शाळांनी यावर तोडगा म्हणून लाखो रूपये खर्चून आपल्या परिसरात, बसगाड्यांमध्ये हवा स्वच्छ करणारी यंत्रणा बसविली आहेत. मात्र, हे तात्पुरते उपाय असून सरकारने हवा प्रदूषणाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, असे बालरोगतज्ज्ञांचे आणि शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.वांद्रे कुर्ला संकुलातील अमेरिकन स्कुल ऑफ बॉम्बने तब्बल ३० लाख खर्चून शाळा परिसरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १० वर आणला आहे. एरवी बीकेसी परिसरातील एक्यूआय २००च्या आसपास असतो. परंतु, एखाद्या ऑपरेशन थिएटरमधील हवा जितकी स्वच्छ असते तितक्या पातळीवर हवेची गुणवत्ता राखण्यात शाळेला यश आले आहे.
मुंबईतील इतरही काही शाळांनी लाखो रूपये खर्चून आपापल्या पद्धतीने या प्रश्नावर तोडगा काढला आहे. काही शाळांनी आधीपासूनच परिसरातील हवा प्रदूषित राहू नये म्हणून उपाययोजना केली होती. तर काहींनी मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न उग्र रूप धारण करू लागल्यानंतर याला प्राधान्य दिले. असेंट इंटरनॅशनल स्कूलने आपल्या प्रत्येक वर्गात दोन एअर प्युरिफायर बसविल्याची माहिती शाळेचे संस्थापक आदित्य पाटील यांनी दिली तर आरबीके इंटरनॅशनल स्कूलने आपल्या वातानुकूलिन यंत्रणेतच एअर प्युरिफायरची यंत्रणा बसवून शाळेतील हवेची गुणवत्ता वधारली आहे. या प्रकारच्या हवेची गुणवत्ता कुठल्याच स्वच्छ हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या देशात आढळून येणार नाही, असा दावा शाळेतर्फे करण्यात येतो. इतकेच काय तर शाळेच्या विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या २० बसगाड्यांमध्येही एअर प्युरिफायर बसविण्यात आले आहेत.
एअर प्युरिफायरने गुणवत्ता सुधारतेहवेची गुणवत्ता सुधारण्याकरिता एअर हँडलिंग युनिट्स वापरले जातात. या यंत्रणेची हवेतील प्रदूषित घटक शोषून घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे एक्यूआय थेट १०वर आणता येतो.परिणाम व्हायचा तो होणारचप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. सुहास प्रभू यांच्या मते या उपाययोजनांनी फारसा फरक पडणार नाही. शाळांनी आपल्या परिसरात हवेची गुणवत्ता राखली असली तरी मुलांचे शाळेबाहेर कुठे जाणे होत नाही का, दूषित हवेशी थोडाफार जरी संपर्क आला तरी त्यामुळे जे नुकसान व्हायचे आहे ते होणारच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
स्वच्छ हवा हा प्रत्येक बालकाचाच हक्क आहे. काही ठराविक शाळांमध्ये एअर प्युरिफायर बसविल्याने काहीच फरक पडत नाही. हे मूल कधी खुल्या मैदानावर खेळायला किवा फिरायला बाहेर पडणार नाही का, त्यामुळे सरकारने प्रदूषणाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.- स्वाती वत्स-पोपट, संस्थापक अध्यक्ष, अर्ली चाईल्डहुड एज्युकेशन इंडिया