स्वच्छ, सुंदर कळवा स्थानक
By Admin | Published: June 16, 2014 03:12 AM2014-06-16T03:12:20+5:302014-06-16T03:12:20+5:30
रेल्वेने मुंबईत प्रवेश करतेवेळी डोंगरदऱ्या आणि लोकलच्या खिडक्यांमधून येणारा वारा येताच आपण समजून जावे की हे कळवा स्टेशन आहे
सुशांत मोरे, मुंबई
रेल्वेने मुंबईत प्रवेश करतेवेळी डोंगरदऱ्या आणि लोकलच्या खिडक्यांमधून येणारा वारा येताच आपण समजून जावे की हे कळवा स्टेशन आहे. साडे तीन लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला कळवा रेल्वेच्या सर्वांत जुन्या स्टेशनपैकी आहे.
ठाणे-कळवा पूल १८६३ तर कळवा पूल १९१४ सालच्या काळातील आहे. बेलापूर औद्योगिक पट्टीला जोडून असल्याकारणाने कळव्यात मोठ्या प्रमाणात वस्ती वाढत गेली. कळव्यातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला तो मुकंद आयरन आणि मफतलालसारख्या उद्योगांनी. पूर्वीच्या काळातील रेतीबंदर मुंब्रा येथे रेती उत्खनन व्यवसायामुळे सर्वांत मोठ्या केंद्ररूपात अवतरला आहे. कळव्यातही हा व्यवसाय फोफावला आहे.
२६ जानेवारी १९८१ रोजी सुरू झालेल्या कळवा कारशेडमध्ये ३५पेक्षा जास्त लोकल ठेवण्यात येतात. काही वर्षांपूर्वी कळवा कारशेडमध्ये ९ लाख रुपये किमतीचा लोकल ट्रेन धुण्याचा दुसरा प्लांटही बसवण्यात आला. मात्र आता कळव्याकडे पाहिल्यास स्थानकाबाहेर अनेक परप्रांतीयांची वस्ती या भागात झाली आहे. त्यामुळे मूळ कळवावासीयांना त्याचा त्रास होत आहे.
जुना मुंबई-पुणे रस्ता कळव्यातूनच जात असल्याने या ठिकाणाहून कळवा स्थानकात जाणाऱ्यांची गर्दीही बरीच असते. कळवा हे ठाणे आणि कल्याणच्या पुढील स्थानकांना जोडणारे एक स्थानक आहे. या स्थानकापूर्वीच ठाण्याकडून येणाऱ्या जलद लोकल कळव्याच्या दुसऱ्या बाजूने जातात.
कळवा स्थानकाला नुकतीच वर्ल्ड बँकेच्या आणि रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. त्या वेळी स्थानकाला स्वच्छतेचा पुरस्कारही प्रदान करण्यात आला
आहे.