मुंबई : येथील हॉटेल बांधकामात अनियमितताप्रकरणी खासदार रवींद्र वायकर यांना आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने (ईओडब्ल्यू) क्लीन चिट दिली आहे. ईओडब्ल्यूने या प्रकरणात न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.
वायकर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांनी उद्धवसेनेचे अमोल कीर्तीकर यांचा ४८ मतांनी पराभव केला. वायकर उद्धवसेनेचे नेते असताना ईओडब्ल्यूने त्यांच्यावर जोगेश्वरी हॉटेलप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वायकरांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. ते खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ईओडब्ल्यूने त्याच प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.
वायकर २०१४ ते २०१९ गृहनिर्माण, उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री होते. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार, जोगेश्वरी येथील एका भूखंडावर क्रीडा सुविधा उपलब्ध करण्याची परवानगी मिळाल्यानंतर वायकर यांनी मुंबई महापालिकेबरोबर करार करून तेथे हॉटेल बांधले.
अपूर्ण माहिती, गैरसमज
वायकर, पत्नी मनीषा व वायकरांचे चार जवळचे सहकारी यांच्याविरोधात तपास बंद करण्यामागे ईओडब्ल्यूने अपूर्ण माहिती आणि गैरसमज ही कारणे दिली आहेत.
भाजपच्या वॉशिंग मशीनमधून वायकरांना स्वच्छ केल्याचे आणखी एक प्रकरण - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस
आता फक्त अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम यालाच क्लीन चिट देणे बाकी आहे - खा. संजय राऊत, उद्धवसेना