मुंबई : वाहतूक विभागातील भ्रष्टाचाराबाबत हेड कॉन्स्टेबल सुनील टोके यांनी केलेल्या आरोपांत तथ्य नसल्याचे म्हणत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी वाहतूक विभागाला क्लीन चिट दिली आहे. मंगळवारी एसीबीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी उच्च न्यायालयात सीलबंद अहवाल सादर केला.टोके यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने जानेवारीमध्ये एसीबीला दिले होते. ‘उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, एसीबीने टोके यांचा जबाब नोंदवला तसेच त्यांनी दिलेल्या सीडीही पाहण्यात आल्या. त्याशिवाय २९ साक्षीदारांचेही जबाब नोंदविण्यात आले. एवढे सगळे केल्यानंतर टोके यांनी केलेल्या आरोपांत काहीही तथ्य नसल्याचा निष्कर्ष एसीबीने काढला आहे,’ अशी माहिती याज्ञिक यांनी खंडपीठाला दिली. टोके यांनी सादर केलेल्या सीडीमध्ये आॅडिओ नाही. सीडीमधील व्हिडीओ यू-ट्युबवरून डाऊनलोड करण्यात आले आहेत. ते व्हिडीओ महाराष्ट्रातील नसून अहमदाबाद येथील आहेत, असा दावाही याज्ञिक यांनी केला. त्यावर उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे वकील प्रदीप हवनूर यांना स्वत: सीडी पाहण्याचे निर्देश दिले. ‘सीडीमध्ये पोलीस लाच स्वीकारतानाचा काही व्हिडीओ आहेत की नाही, ते पाहा आणि आम्हाला त्याची माहिती द्या,’ असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी २९ मार्चपर्यंत तहकूब केली. भ्रष्टाचारी वाहतूक पोलिसांविरुद्ध खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी टोके यांनी याचिकेद्वारे केली आहे. हॉटेलबाहेर ट्रक्सना बेकायदेशीरपणे पार्किंग देण्यात येते. त्यासाठी पंचतारांकित हॉटेल्सकडून दरमहा ४० ते ५० हजार रुपये हफ्ता घेण्यात येतो. बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा ट्रक, जकात चुकवणाऱ्या ट्रकलाही पोलीस लाच घेऊन सोडून देतात. तसेच बांधकामाच्या साहित्याने भरलेला ट्रक बेकायदेशीरपणे पार्क करण्यात आला असल्यास पोलीस त्यांच्याकडूनही लाच स्वीकारून सोडतात. एवढेच नाहीतर, एखादा मद्यधुंद अवस्थेतही गाडी चालवत असल्यास त्यालाही पैसे घेऊन सोडण्यात येते,’ असे टोके यांनी याचिकेत म्हटले आहे. (प्रतिनिधी)
वाहतूक विभागाला ‘क्लीन चिट’
By admin | Published: March 15, 2017 4:13 AM