खडक लागत नाही, तोवर प्रत्येक नाला साफ करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश, गाळ काढूनही तरंगतोय कचरा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 11:14 AM2023-05-25T11:14:36+5:302023-05-25T11:14:51+5:30
- रतींद्र नाईक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील नालेसफाईच्या कामाची नुकतीच पाहणी केली. या दौऱ्यात ...
- रतींद्र नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील नालेसफाईच्या कामाची नुकतीच पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी नालेसफाई तळाला खडक लागेपर्यंत करा असे आदेश पालिका प्रशासनाला दिले. मात्र ९० टक्क्यांहून अधिक नालेसफाई झाली असून तोंडावर आलेला पावसाळा पाहता खडक तळाला लागेपर्यंत नालेसफाई तूर्तास तरी शक्य नसल्याचे खुद्द पालिकेच्याच काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर वरचेवर करण्यात आलेल्या नालेसफाईनंतरही नाल्यात पूर्वीप्रमाणे कचरा तरंगतच आहे त्यामुळे पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई होण्याचा धोका आहे.
मुंबई महापालिकेने यंदा मार्च महिन्यातच नालेसफाईला सुरुवात केली. पालिका प्रशासनाने ३१ मे पर्यंत ९ लाख ८२ हजार ४२६ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी ९८ टक्के गाळ काढल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
खोलवर नालेसफाई तूर्तास शक्य नाही
पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, ९८ टक्के नालेसफाई झाली असून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे खोलवर नालेसफाई तूर्तास तरी शक्य नाही. पावसाळा तोंडावर आला आहे. खोलवर नालेसफाई करायची असल्यास पुन्हा नव्याने कंत्राट काढावे लागेल. या गोष्टींना बराच कालावधी लागेल.
अहवाल तयार : खोलवर नालेसफाई का शक्य नाही त्याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात नालेसफाईला किती वेळ लागेल, खर्च, नवीन टेंडर यासह इतर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
छोट्या नाल्यांतील गाळ तसाच
मुंबई शहर व उपनगरात १५०८ छोटे व ३०९ मोठे नाले आहेत. या शिवाय २ हजार किमी लांबीची रस्त्यालगत गटारे आहेत. पावसाळा पूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या व लहान नाल्यातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र असे असले तरी लहान नाल्यातील गाळ तसाच कायम आहे.
नाल्यातील गाळापेक्षा त्या पाण्याची हालचाल होणे गरजेचे आहे. त्यामुळे नाल्यात अडथळा ठरणारा गाळ, कचरा हटविला पाहिजे. जपानमध्ये पाण्याच्या निचऱ्यासाठी जी यंत्रणा वापरली जाते त्याचा अभ्यास करायला हवा.
- पंकज जोशी, मुख्य संचालक, अर्बन सेंटर मुंबई
कंत्राटदारांकडून जास्तीतजास्त १ फुटापर्यंत गाळ काढला जातो. नालेसफाईचे काम १२ महिने सुरू राहायला पाहिजे. तरच नाले स्वच्छ राहतील तसेच पालिका म्हणते नालेसफाई ९८ टक्के झाली आहे, मात्र प्रत्यक्षात ३५ टक्केच नालेसफाई झाल्याचे दिसून येत आहे.
- रवी राजा, काँग्रेस माजी विरोधी पक्षनेते