Join us

विनामास्क आढळलेल्या ६७ नागरिकांना क्लीन अप मार्शलने दंड ठोठावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 4:24 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनावर नियंत्रण मिळविले जात असतानाच कोरोनाची दुसरी लाट येऊ नये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनावर नियंत्रण मिळविले जात असतानाच कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून मुंबई महापालिका सातत्याने काळजी, खबरदारी घेत आहे. सामाजिक अंतर पाळण्याचे, मास्क घालण्याचे आवाहन करत आहे. मात्र नागरिक नियमांना धाब्यावर बसवत जणूकाही कोरोनाला आमंत्रणच देत असून, असेच एक प्रकरण समोर आले आहे. लोअर परळ येथील एका हॉटेलमध्ये एकत्र आलेल्या सुमारे ४०० नागरिकांना सामाजिक अंतर ठेवण्यासह मास्क घालण्याचे आवाहन केले. तर येथे कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत मास्क घातलेला नाही अशा ६७ नागरिकांना घटनास्थळीच क्लीन अप मार्शलने दंड ठोठावला.

मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ डिसेंबरच्या रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास लोअर परेल तोडी मिल येथील हॉटेल इप्टिोमेमध्ये सुमारे ४०० नागरिक एकत्र आल्याचे निदर्शनास आले. यातील बहुतांशी हे विनामास्क वावरत होते. शिवाय येथे सामाजिक अंतराचे तीनतेरा वाजले होते. कोरोनाचे नियम संबंधितांनी धाब्यावर बसविले. या वेळी मुंबई महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत सामाजिक अंतराचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. मेगा फोनवरून उपस्थितांना माहिती देण्यात आली. शिवाय कोविडच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले. तर विनामास्क असलेल्या ६७ नागरिकांना क्लीन अप मार्शलने घटनास्थळीच दंड ठोठावला.