‘क्लीन अप मार्शल्स’ पुन्हा वादग्रस्त, स्थायी सदस्यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 07:15 AM2017-11-30T07:15:14+5:302017-11-30T07:15:21+5:30
ब-याच वादानंतर पुनरुज्जीवित करण्यात आलेली ‘क्लीन अप मार्शल’ योजना पुन्हा वादग्रस्त ठरू लागली आहे. हे ‘क्लीन अप’ नव्हे तर ‘चोर मार्शल्स’ आहेत. मुंबईकरांकडून हफ्तावसुलीचे काम हे मार्शल्स करीत असतात,
मुंबई : ब-याच वादानंतर पुनरुज्जीवित करण्यात आलेली ‘क्लीन अप मार्शल’ योजना पुन्हा वादग्रस्त ठरू लागली आहे. हे ‘क्लीन अप’ नव्हे तर ‘चोर मार्शल्स’ आहेत. मुंबईकरांकडून हफ्तावसुलीचे काम हे मार्शल्स करीत असतात, असा खळबळजनक आरोप स्थायी समिती सदस्यांनी आज केला. याची गंभीर दखल घेण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. त्यानंतर नव्याने ‘क्लीन अप मार्शल्स’ नेमण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र यामध्ये मार्शल्सच्या जुन्या संस्थांनाच संधी मिळाल्याने स्वच्छतेच्या मोहिमेबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
मुंबईकरांना शिस्तीचे धडे देण्याची ‘क्लीन अप मार्शल्स’ योजना पालिकेने काही वर्षांपूर्वी आणली होती. मात्र मार्शल्स नागरिकांकडून दंडाच्या नावाखाली वसुली करीत असल्याच्या बºयाच तक्रारी आल्यानंतर ही योजना बंद करण्यात आली. तीन वर्षांपूर्वी केंद्राने स्वच्छता अभियान सुरू केल्यामुळे मुंबईत पुन्हा ‘क्लीन अप मार्शल्स’ नेमण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र या मार्शल्सने पुन्हा मनमानी सुरू करू नये, यासाठी काही अटी टाकून जुलै २०१६ मध्ये नवीन टीम नियुक्त करण्यात आली. या मार्शल्सची मुदत संपल्यामुळे नवीन मार्शल्स नेमण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आज मंजुरीसाठी आला होता.
मात्र ‘क्लीन अप मार्शल्स’ नव्हे हे तर ‘चोर मार्शल्स’, असा आरोप भाजपाचे सदस्य विद्यार्थी सिंह यांनी केला. नागरिकांना दमदाटी करून त्यांच्याकडून दंड वसूल करतात. रेल्वे किंवा गर्दीच्या ठिकाणी उभे राहून हे मार्शल्स सावज शोधत असतात. खेड्यातून किंवा दुसºया राज्यातून आलेल्या नागरिकांना रेल्वे स्थानकांवर गाठून त्यांच्याकडून मनमानी दंडवसुली करण्याचे काम हे मार्शल्स करीत आहेत. अशा तक्रारी सदस्यांनी केल्या. या मार्शल्सना जास्त कचरा होतो त्या ठिकाणी उभे करण्यात येईल, अशी हफ्तावसुली व मनमानी होऊ नये याची त्यांना ताकीद देण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
कंपनीला साडेचार कोटी
१ जानेवारी २०१७ पासून आतापर्यंत मार्शल्सने नऊ कोटी दंड वसूल केला. यामध्ये एप्रिल महिन्यात सर्वाधिक ८९.०९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामुळे वर्षभरातच पालिकेच्या तिजोरीत साडेचार कोटी रुपये जमा झाले आहेत. तर निम्मे म्हणजेच सुमारे साडेचार कोटी रुपये मार्शल्स पुरवणाºया कंपनीच्या तिजोरीत जाणार आहेत.
मनमानी वसुली
रेल्वे स्थानक, बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मार्शल्स उभे राहून नागरिकांकडून मनमानी वसुली करीत आहेत. याची तक्रार नगरसेवकांनी केल्यानंतर जेथे गरज आहे तेथेच या मार्शल्सना उभे करण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले.
जुन्याच संस्थांना कंत्राट
नवीन क्लीन अप मार्शल्स नेमण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने आज मंजूर केला. मात्र गेल्या वर्षी या मोहिमेत असलेल्या बहुतांशी संस्थांना पुन्हा हे कंत्राट मिळाले आहे.