क्लीन अप मार्शल्सना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 04:48 AM2018-12-27T04:48:38+5:302018-12-27T04:49:05+5:30
मुंबईकरांना स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या महापालिकेलाच स्वच्छता मोहिमेंतर्गत कारवाई करण्यासाठी नवीन संस्था सापडलेली नाही. यामुळे पुन्हा एकदा क्लीन अप मार्शल्सलाच तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबईकरांना स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या महापालिकेलाच स्वच्छता मोहिमेंतर्गत कारवाई करण्यासाठी नवीन संस्था सापडलेली नाही. यामुळे पुन्हा एकदा क्लीन अप मार्शल्सलाच तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. मात्र, संपूर्ण २४ विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या २२ संस्थांपैकी दोन संस्थांना बाद करून उर्वरित संस्थांना ही मुदतवाढ मिळणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे, थुंकणे अशा पद्धतीने मुंबईत अस्वच्छता पसरविणाºयांवर क्लीन अप मार्शल्सच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत असते. मात्र, काही मार्शलचे नागरिकांशी तोडपाणी करीत असल्याचे समोर आले, तर काही जबरदस्तीने दंड वसूल करीत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे २००७ मध्ये सुरू करण्यात आलेली ही योजना बंद करण्यात आली होती. मात्र, स्वच्छ भारत अभियानांर्तगत मुंबईत सफाई सुरू असताना, अशा क्लीन अप मार्शल्सची आवश्यकता पालिकेला प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे ही योजना पुनर्जीवित करण्यात आली, परंतु मार्शल्सबाबत अधूनमधून तक्रारी येत असतात.
स्वच्छ भारत अभियानाचे पथक मुंबईत आले, तेव्हाही काही ठिकाणी मार्शल्स अपेक्षित जागेवर नव्हते. याची दखल घेऊन नवीन संस्थेची नियुक्ती करताना मार्शल्सना जरब बसेल, अशी नियमावली तयार करण्यात येईल, असे प्रशासनाने नोव्हेंबर महिन्यात स्पष्ट केले होते.
मात्र, नवीन संस्था शोधण्यात महापालिकेला यश आलेले नाही. त्यामुळे पुन्हा जुन्याच संस्थांना मुदतवाढ मिळणार आहे. ९ डिसेंबर, २०१८ रोजी क्लीन अप मार्शल्सला दिलेली चार महिन्यांची मुदतवाढ संपली. मात्र, नवीन संस्था मिळत नसल्याने जुन्याच संस्थेला मुदतवाढ मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी प्रशासनाने आणला आहे.
अशी आहे योजना
२००७ मध्ये मुंबईत क्लीन अप मार्शल्सची नियुक्ती करण्यात आली होती. सार्वजनिक परिसर अस्वच्छ करणाºया नागरिकांना दंड करण्याची जबाबदारी या पथकावर होती. नागरिकांकडून जबरदस्तीने दंडवसुली, सार्वजनिक परिसर अस्वच्छ करणाºयाकडून लाच घेऊन त्यांना सोडून देणे, अशा तक्रारी आल्यानंतर ही योजना बंद करण्यात आली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईच्या स्वच्छतेसाठी या पथकाला पुनर्जीवन मिळाले.
यांना मुदतवाढ नाही : सार्वजनिक परिसर अस्वच्छ करणाºया नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने पुन्हा क्लीन अप मार्शलची फौज आणली. मात्र, काही मार्शल्सबाबत आजही तक्रारी येत आहेत. त्यामुळे यापुढे मार्शल्सबाबत तक्रार आल्यास त्याची गंभीर दखल महापालिका घेणार आहे. संबंधित मार्शलची चौकशी करून त्याची सेवाच खंडित करण्यात येणार आहे, असा इशारा महापालिकेने दिला होता. त्यानुसार, एल विभागातील मार्शल्सबाबत तक्रारी असल्याने त्यांची सेवा खंडित करण्यात आली आहे, तर बी विभागातील संस्थेने कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्यांना काम देण्यात आलेले नाही.