मुंबई :
काही दिवसांपूर्वी माझगाव परिसरातून जात असताना अस्वच्छता पाहून संतप्त झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी पुन्हा एकदा मुंबई महापालिका प्रशासनाला झेलावी लागली आहे. यावेळी निमित्त होते, कुर्ला येथील वत्सलाताई नाईकनगर एसआरए वसाहतीतील अस्वच्छतेचे! तेथील अस्वच्छतेच्या प्रश्नी त्यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या उपस्थितीत पालिका अधिकारी आणि ठेकेदारांना चांगलेच फैलावर घेतले. या परिसरातील स्वच्छता, डागडुजी करण्यासाठी त्यांनी आयुक्तांना एका महिन्याची मुदत दिली.
राज्यस्तरीय मोहिमेचा शुभारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटी येथे झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अचानक कुर्ला नेहरूनगर परिसरातील वत्सलाताई नाईकनगर एसआरए वसाहतीला भेट दिली. तेथील शौचालय आणि परिसराच्या साफसफाईची पाहणी केली. तेथील अस्वच्छता पाहून त्यांचा पार चढला. दिवसातून पाच वेळा साफसफाई होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सगळ्यांना फैलावर घेतले.
...तर अधिकारी, कर्मचाऱ्यांना बजावा कारणे दाखवा नोटीस स्वच्छता केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे, असे सांगून मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे, असे निर्देश त्यांनी आयुक्तांना दिले. स्थानिकांना तातडीने सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दररोज पाच वेळा स्वच्छतागृहांची स्वच्छता करावी, पालिकेच्या खर्चाने दुरुस्ती, डागडुजी करावी. तसे न केल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावावी, कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, असे त्यांनी आयुक्तांना स्पष्टपणे सांगितले.