रुग्णालयांतून क्लीन अप मार्शलची हकालपट्टी; नागरिकांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 06:48 IST2025-03-09T06:47:54+5:302025-03-09T06:48:04+5:30
'क्लीन अप मार्शल' पैसे मागत असल्याच्या तक्रारी

रुग्णालयांतून क्लीन अप मार्शलची हकालपट्टी; नागरिकांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी
मुंबई : खंडणी आणि लाचखोरीचा आरोप झाल्यामुळे काही वर्षांपूर्वी गुंडाळलेली, त्यानंतर पुन्हा सुरू केलेली 'क्लीन अप मार्शल मोहीम' पुन्हा एकदा गुंडाळावी लागणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पैसे उकळत असल्याच्या आरोपावरून मुंबई महापालिकेच्या सहा रुग्णालयांमधील 'क्लीन मार्शल'ची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. 'क्लीन अप मार्शल' पैसे मागत असल्याच्या तक्रारी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाइकांनी केल्यानंतर पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला.
अस्वच्छता करणाऱ्यांना जरब बसावी, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हावी, यासाठी महापालिकेने एप्रिल २०२४ पासून प्रत्येक विभागात ३० मार्शल नेमले. पालिकेच्या सहा रुग्णालयांमध्येही क्लीन अप मार्शल नेमण्यात आले होते. अस्वच्छता करणाऱ्यांना जरब बसावी, यासाठी नायर, शीव, केईएम, कूपर, राजावाडी आणि कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात क्लीन अप मार्शल नियुक्त केले होते. मात्र, कारवाईच्या नावाखाली हे मार्शल रुग्णांच्या नातेवाइकांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी रुग्णालय प्रशासनाकडे येऊ लागल्या. त्यामुळे क्लीन अप मार्शलची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. गेल्या महिन्यात 'क्लीन अप मार्शल' पुरवणाऱ्या संस्थांना पालिकेने कारवाई केली होती. निश्चित केलेल्या संख्येपेक्षा कमी संख्येने मार्शलचा पुरवठा केल्याबद्दल या संस्थांना ६५ लाख दंड ठोठावण्यात आला होता.
दंडाची कारवाई
रस्त्यावर १ थुंकणे, कचरा टाकणे, रस्त्यावर अंघोळ करणे, मलमूत्र विसर्जन करणे आदी कारणास्तव क्लीन अप मार्शल नागरिकांकडून २०० रुपये ते एक हजार रुपये दंड वसूल करतात.
वसूल केलेल्या दंडापैकी ५० टक्के रक्कम क्लीन अप मार्शलचा पुरवठा करणाऱ्या संस्थेला, तर ५० टक्के रक्कम पालिकेला मिळते.