Join us  

स्वच्छ पाणी, सकस आहार आवश्यक, जागतिक आरोग्य दिनानिमित्त तज्ज्ञांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 9:03 AM

World Health Day: स्वच्छ परिसर, स्वच्छ पाणी आणि सकस आहार या निसर्गस्नेही त्रिसूत्रींचा अवलंब ही पृथ्वीच्या आरोग्यासह सामान्यांच्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे.  

- स्नेहा मोरेमुंबई : सध्या आरोग्य सुदृढ राखायचे असेल तर पुन्हा एकदा नागरिकशास्त्राचे धडे गिरविण्याचा संदेश वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. स्वच्छ परिसर, स्वच्छ पाणी आणि सकस आहार या निसर्गस्नेही त्रिसूत्रींचा अवलंब ही पृथ्वीच्या आरोग्यासह सामान्यांच्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे.  त्यामुळे महामारी व हवामान बदलाचा एकत्र मुकाबला केल्याखेरीज तरणोपाय नाही, असा संदेश जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी दिला आहे.यंदा जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना ‘अवर प्लॅनेट अवर हेल्थ’ अशी आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तज्ज्ञांनी शहर वाचवली तरच आरोग्य सुदृढ राखता येईल, असे अधोरेखित केले आहे. विकासाच्या नावाने पर्यावरणात केलेल्या अविवेकी व अवास्तव हस्तक्षेपामुळे पृथ्वीची धारण क्षमता क्षीण होत असून, सजीव सृष्टीत पशुपक्षी, वन्यजीव यांच्यावर मानवाच्या अतिक्रमणामुळे प्राणिजन्य विषाणूंचे आक्रमण व संक्रमण होत असल्यामुळे कोरोनासारख्या भीषण संकट ओढवले आहे, असे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. आशिष शहा यांनी सांगितले. सध्या मानव अवलंबत असलेली जीवनशैली अत्यंत चुकीची आहे. यात पर्यावरणीय व निसर्गाच्या संतुलनाचा विचार केलेला नाही. पुढील काळ हा पृथ्वीप्रमाणेच सामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आव्हानात्मक आहे. कोरोनाच्या अनुभवातून भविष्यातील संकटांची चाहूल ओळखून छोट्या सवयी व बदल रोजच्या जीवनशैलीत अंगीकारले पाहिजे, असे कोरोना टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

बदलत्या पर्यावरणाचा आरोग्यावर परिणामबदलत्या पर्यावरणामुळे मानवी आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यामुळे नवनवीन आजारांची भर पडत आहे. आरोग्य नीट राहण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, नव्हे कर्तव्य समजले पाहिजे. आताची परिस्थिती आपल्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुरक्षेत कमी पडतेय ही मोठी खेदजनक बाब असल्याचेही डॉक्टरांनी नमूद केले.

 

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स