उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणखी ४ वॉर्डमध्ये सफाई
By सीमा महांगडे | Published: December 16, 2023 09:58 PM2023-12-16T21:58:12+5:302023-12-16T21:58:48+5:30
यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांनी शनिवारी आढावा बैठक घेत सर्व संबंधितांना मार्गदर्शन करत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
मुंबई: डीप क्लिनिंग ड्राइव्हअंतर्गत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या चार परिमंडळातील चार वॉर्डात उद्या स्वच्छता केली जाणार आहे. परिमंडळ १ मध्ये ई विभाग, परिमंडळ २ मध्ये एफ उत्तर विभाग, परिमंडळ ५ मध्ये एम पश्चिम विभाग आणि परिमंडळ ६ मध्ये एन विभाग यांचा त्यात समावेश आहे. अतिरिक्त मनुष्यबळासह विविध संयंत्राच्या सहाय्याने वॉर्डातील कानाकोपऱ्याची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज आहेच मात्र मुंबईकर नागरिकांनी देखील या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.
संपूर्ण स्वच्छता मोहिमेत सकाळी ७ वाजता एन विभागातील अमृत नगर सर्कल येथून मोहिमेची सुरुवात होईल आणि त्यानंतर ७.४० वाजता एन विभागातील कामराज नगर, ८.१० वाजता घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रुग्णालय; सकाळी ८.४५ वाजता एम पश्चिम विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान; सकाळी ९.०० टिळक नगर; सकाळी १०.०० वाजता एफ उत्तर विभागातील भैरवनाथ मंदीर मार्ग; सकाळी १०.३० वाजता ई विभागातील महाराणा प्रताप चौक आदी ठिकाणी मुख्यमंत्री महोदय स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांनी शनिवारी आढावा बैठक घेत सर्व संबंधितांना मार्गदर्शन करत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.