Join us

सफाई कामगाराच्या मुलीची आर्त साद, बाबा थोपट ना मला मांडीवर घेऊन...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 2:36 AM

संडे अँकर । सफाई कामगाराच्या मुलीची आर्त साद

स्नेहा मोरे

मुंबई : बाबा तू रोज भेटत का नाहीस? आता मला रोज खाऊ का आणत नाहीस? बाबा ये घरी, थोपट ना मला मांडीवर घेऊन... ही हृदय पिळवटून टाकणारी आर्त साद आहे सफाई कामगाराच्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीची. मुंबईतील कोरोनाच्या लढ्यात असणाऱ्या कस्तुरबा रुग्णालयातील सफाई कामगाराची ही व्यथा आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून कर्तव्यनिष्ठपणे काम करणाºया या सफाई कामगाराने मागचे काही दिवस आपल्या मुलीला जवळ घेतले नाही. ही कैफियत सांगताना या सफाई कामगाराचे डोळेही पाणावले होते.

कस्तुरबा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे. शिवाय, आता कोरोनाचा धोका हा स्थानिक संसर्गाच्या पातळीवर आल्याने प्रत्येकालाच आपल्या जीवासह कुटुंबीयांची चिंंता सतावतेय. त्यामुळे १०-१२ तास काम करून त्यानंतर घरी न जाता ही मंडळी रुग्णालयातच वा विलगीकरण केंद्रांमध्ये थांबत आहेत. अशाच एका चिंतातुर सफाई कर्मचाºयाने सांगितले की, वीस दिवस उलटून गेलेत पोरीला जवळ घेतलेले नाहीय. पत्नीशी लांबूनच संवाद होतोय. विभक्त कुटुंब असल्याने घरात फक्त पत्नी, मुलगी आणि मी इतकेच सदस्य आहेत.कोरोनामुळे असा प्रसंग आयुष्यात येईल याचा कधी विचारच केला नव्हता. साडेतीन वर्षांची आहे माझी पोर, तिला दिवसातून एकदा तरी मी मांडीवर घेऊन थोपटतो. त्यावेळी तोडके-मोडके शब्द जुळवत माझी लेकच राजा-राणीच्या गोष्टी सांगते, असा आमचा दिनक्रम असायचा. आता कोरोनामुळे संसर्गाच्या भीतीने घरी जातच नाही. पण आठवण, काळजीने कधीतरी घराकडे पावलं वळतातच. मग दूर अंतरावरून पत्नी आणि मुलीची गाठभेट होते, माझ्याकडे येण्यासाठी ती हट्ट करते, पण कशीबशी समजूत घालून तिथून पुन्हा कामावर येतो. पहिल्यांदाच अनुभवत असलेला हा काळ आव्हानात्मक वाटतोय, पण हे कळून चुकलंय की संघर्ष जगण्याचा-मरण्याचा आहे.

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या