Join us

सफाई कामगारांना प्रमाणित भाडेपट्टीने हक्काचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 1:52 AM

महापालिकेच्या वसाहतीमध्ये पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना ते राहत असलेले घर प्रमाणित भाडेपद्धतीने देण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई : महापालिकेच्या वसाहतीमध्ये पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना ते राहत असलेले घर प्रमाणित भाडेपद्धतीने देण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. या प्रस्तावाला पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बुधवारी मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यात सुमारे २८ हजार सफाई कामगार काम करतात. दिवसरात्र स्वच्छतेचे काम करणाºया कामगारांना कुटुंबासह राहण्यासाठी ‘भाडेरहित सेवा निवासस्थानां’चे वाटप करण्यात येते. या निवासस्थानांमध्ये सफाई कामगार वारसाहक्काने पिढ्यानपिढ्या राहत आहेत. ८ नोव्हेंबर १९७१ च्या परिपत्रकानुसार बीआयटी चाळीमध्ये ‘भाडेरहित’ घरात राहणाºया घनकचरा व्यवस्थापन खात्यामधील चतुर्थश्रेणी कामगारांची घरे ‘प्रमाणित भाडे पद्धती’त करण्यात आली आहेत.मात्र १९४६ पासून जुने पलटन रोड येथील वसाहतीमध्ये राहत असलेल्या सफाई कामगारांना ही घरे संबंधित कर्मचाºयांच्या नावे प्रमाणित भाडेपद्धतीने करण्यात आली नाहीत. या सफाई कामगारांसाठी १ एप्रिल १९४६ च्या वास्तव्याची अट शिथिल करून १ एप्रिल १९८५ करण्यात यावी व १ एप्रिल १९८५ पूर्वीपासून महापालिका वसाहतीमधील एकाच सदनिकेमध्ये वारसा हक्काने पिढ्यानपिढ्या वास्तव्य करणाºया सफाई कामगाराच्या नावे ती सदनिका प्रमाणित भाडे पद्धतीने करण्यात यावी, या प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी समर्थन दिले.