Join us

चौपाट्या झाल्या स्वच्छ!

By admin | Published: September 29, 2015 1:43 AM

गणेशमूर्ती विसर्जनाचे पर्व निर्विघ्न पार पडल्यानंतर महापालिकेच्या वतीने सोमवारी गिरगाव चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

मुंबई : गणेशमूर्ती विसर्जनाचे पर्व निर्विघ्न पार पडल्यानंतर महापालिकेच्या वतीने सोमवारी गिरगाव चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी स्वच्छता मोहिमेसह श्रमदानही करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आयुक्त अजय मेहता यांनी मुंबईकरांना शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे आवाहन केले. मोहिमेला विद्यार्थ्यांनीही हजेरी लावली होती.महापालिकेच्या वतीने ११ आॅक्टोबरपर्यंत मुंबईत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. अभियानाचा भाग म्हणून गिरगाव चौपाटीवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. या वेळी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांनी स्वच्छतेसाठी स्वाक्षरी मोहीम फलकांवर स्वाक्षरी केल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना सामूहिक स्वच्छतेची शपथ दिली. शिवाय पालिकेकडून तयार करण्यात आलेल्या तीन स्वच्छता रथांना या वेळी झेंडा दाखवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.यात ‘डी’ विभागाचे १०० सफाई कामगार, ५० अधिकारी, जयहिंद महाविद्यालयाचे १००, साबुसिद्दीक महाविद्यालयाचे ८०, विल्सन महाविद्यालयाचे २० विद्यार्थी सहभागी झाले होते. जुहू तसेच अन्य चौपाट्यांवरही स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. (प्रतिनिधी)-----------गणेशोत्सवामध्ये सुमारे ६८५ टन निर्माल्य महापालिकेकडे जमा झाले. हे निर्माल्य प्रशासकीय विभागांमध्ये असणाऱ्या खतनिर्मिती प्रकल्पांमध्ये हलविण्यात आले. निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेस सुरुवातही झाली आहे. एका महिन्याच्या कालावधीत निर्माल्याचे रूपांतर सेंद्रीय खतामध्ये होईल.हे खत महापालिकेच्या उद्यानांमध्ये असलेल्या झाडांसाठी वापरण्यात येणार आहे. मंडळांमध्ये निर्माण होणारे निर्माल्य गोळा करण्यासाठी २५६ निर्माल्य कलश पुरविण्यात आले होते. निर्माल्य गोळा करून खतनिर्मिती प्रकल्पाच्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी १ हजार १४६ टेम्पोंची व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जनस्थळी व लगतच्या परिसराची साफसफाई करण्यासाठी अशासकीय संस्थांकडून सरासरी ६३१ कामगारांची व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जनस्थळी व लगतच्या परिसरात जमा होणारा कचरा वाहून नेण्यासाठी २९४ अतिरिक्त वाहनांच्या सेवा (डम्पर्स) पुरविण्यात आल्या होत्या.-----------मुंबई महापालिका स्वच्छतेच्या दृष्टीने यशस्वी काम करीत आहे. गणेशमूर्ती विसर्जनानंतर चौपाटीवर प्रतीकात्मक स्वरूपात आम्ही स्वच्छता करीत आहोत; मात्र पालिकेचे सफाई कामगार अहारोत्र नियमितपणे हे स्वच्छतेचे काम करतात. या पर्यावरणपूरक स्वच्छता मोहिमेला नागरिकांनीही हातभार लावावा. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री