मुंबई : शनिवारी आणि रविवारी मुंबई शहर व उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. सोमवारी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला होता. परंतु अधूनमधून काही पावसाच्या मोठ्या सरी आणि रिपरिप सुरू होती. मुसळधार पावसासोबत मुंबईलगतच्या समुद्रामध्ये लाटांना उधाण आले होते. या वेळी समुद्रातील कचरा मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर येतो. सोमवारी गिरगाव चौपाटीवर हिंदुजा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवत ४० किलोहून अधिक कचरा गोळा केला.हिंदुजा महाविद्यालयाचा विद्यार्थी अयान मोटरवाला याने सांगितले की, महाविद्यालयाचा ‘पन्हा’ हा आंतर महाविद्यालयीन महोत्सव आहे. यामार्फत विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात. महोत्सवांतर्गत ‘बीच क्लीनअप’ हासुद्धा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. यात मुंबईलगतच्या समुद्रकिनाºयावर स्वच्छता मोहीम आयोजित केली जाते. पाऊस खूप कोसळल्याने सर्वत्र कचरा जास्त पसरतो. यामध्ये समुद्रकिनाºयावर मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. आम्ही सोमवारी गिरगाव चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवून ४० किलोहून अधिक कचरा जमा केला. गेल्या सहा वर्षांपासून ‘बीच क्लीनअप’ ही मोहीम आम्ही राबवित आहोत.
गिरगाव चौपाटीवर स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:04 IST