आम्ही काम करायला निघालोय, काम करून लोकांना दाखवू - मंगलप्रभात लोढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 01:17 PM2022-11-29T13:17:30+5:302022-11-29T13:20:27+5:30
या अभियानात २ लाखांहून अधिक नागरिक सहभागी होणार आहेत अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
मुंबई - येत्या १ डिसेंबरपासून ते ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईच्या उपनगरमध्ये स्वच्छ मुंबई अभियान चालवलं जाणार आहे. उपनगरमधील १५ वार्डात हे अभियान राबवलं जाईल. त्याअंतर्गत सर्व सामाजिक संस्था, सरकारी अधिकारी, कर्मचारी त्याचसोबत राजकीय कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत. या अभियानात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.
याबाबत मंगलप्रभात लोढा म्हणाले की, स्वच्छता अभियान हे कुठल्याही निवडणुकीच्या दृष्टीने नाही. देशात प्रत्येकवेळी काही ना काही निवडणुका होत असतात. आम्ही काम करायला निघालोय. काम करून लोकांना दाखवू. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर लोकांच्या सहभागातून पोलीस, महापालिका अधिकारी एकत्रित येऊन अभियान राबवणार आहे. त्यात रेल्वे स्टेशन, पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, सोसायटी, धार्मिक स्थळं, रस्ते आणि मैदाने याठिकाणी स्वच्छता करणार आहे. त्याचसोबत ६०० पेक्षा जास्त सार्वजनिक शौचालयाचं नुतनीकरण करून त्यांची क्षमता वाढवण्याचं काम या कालावधीत करणार आहोत तसेच शौचालय चकाचक ठेवण्यासाठी नेमणार १० फिरती पथकं नेमणार असल्याचं त्यांनी सांगितले.
या अभियानात २ लाखांहून अधिक नागरिक सहभागी होणार आहेत. अभियाना अंतर्गत सार्वजिनक ठिकाणे, रस्ते, फुटपाथ, उद्याने, सार्वजनिक शौचालय, शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये, समुद्र किनारे, पर्यटन स्थळ, उड्डाणपूले याठिकाणी स्वच्छता राबवण्यात येईल. १ ते ३१ डिसेंबरच्या काळात ज्यांना सुट्टीच्या दिवसात शनिवार, रविवारी वेळ मिळेल त्यांनी संबंधित वार्डानुसार स्वच्छता अभियानात भाग घ्यावा. स्वच्छ मुंबई, स्वस्थ मुंबई याला लोकांचाही प्रतिसाद मिळतोय असं मंत्री लोढा यांनी म्हटलं.