मुंबई : प्रत्येक जण आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवतो; मात्र तीच स्वच्छता आपल्या परिसरामध्ये ठेवण्याची उदासीनता बहुतांशी नागरिकांमध्ये दिसून येते. हीच उदासीनता संपवण्यासाठी दहिसर (पूर्व) कोकणीपाडा वॉर्ड क्र. ४ येथील विविध महिला बचत गटांच्या सदस्यांनी एकत्र येत नुकतीच स्वच्छता मोहीम राबविली. सोनेरी महिला बचत गट, श्री धनलक्ष्मी महिला मंडळ, श्री शारदा महिला बचत गट, साई सेवा महिला बचत गट, श्रद्धा सेवा सह. संस्था, साई महिला बचत गट आणि माउली भगवती महिला सेवा संघ संस्था या एकूण ७ महिला बचत गटांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन मुंबई महापालिकेच्या साहाय्याने ही मोहीम पार पाडली.आर / उत्तर विभाग आणि महापालिकेच्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान अंतर्गत झालेल्या या मोहिमेमध्ये लोकसहभाग, जनजागृती, प्रभातफेरी आणि पथनाट्य अशा उपक्रमांचा समावेश होता. या वेळी प्रत्येक महिला बचत गटाने विभागून देण्यात आलेल्या एका परिसराची जबाबदारी घेत तो परिसर स्वच्छ करून रहिवाशांना जागृत केले. शिवाय विविध ठिकाणी स्वच्छता जनजागृतीवर आधारित पथनाट्य सादर करून रहिवाशांना आपआपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहनही केले. त्याचबरोबर या वेळी महापालिका आणि महिला बचत गटांच्या वतीने लहान मुलांसाठी स्वच्छतेवर आधारित विशेष चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. (प्रतिनिधी)
बचत गटांकडून स्वच्छता मोहीम
By admin | Published: October 12, 2015 5:00 AM