Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या हाती ट्रॅक्टरचं स्टेअरिंग, जुहू बीचवर स्वच्छता मोहिमेत घेतला सहभाग!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 11:22 AM2023-12-09T11:22:20+5:302023-12-09T11:23:15+5:30
मुख्यमंत्र्यांनी सकाळी सकाळी सातच्या सुमारास मुंबईतील जुहू बीच या ठिकाणी जाऊन स्वच्छ मुंबई मोहिमेचा प्रारंभ केला.
मुंबई : स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक विभागात व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता मोहीम म्हणजेच डीप क्लिनिंग ड्राईव्ह राबविण्याचे नियोजन केले आहे. याअंतर्गत मुंबई महानगरपालिकेकडून आज जुहू भागात स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. या स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्रीएकनाथ शिंदेही सहभागी झाले. मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी स्वच्छता कार्यक्रमादरम्यान रखडलेल्या गोखले ब्रिजच्या कामाची देखील पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या.
मुख्यमंत्र्यांनी सकाळी सकाळी सातच्या सुमारास मुंबईतील जुहू बीच या ठिकाणी जाऊन स्वच्छ मुंबई मोहिमेचा प्रारंभ केला. यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पाण्याचा पाईप हाती घेत स्वतः या मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई पालक मंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालक मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. यादरम्यान, कंत्राटदाराशी संवाद साधत काम वेळेवर पूर्ण करण्याची तंबी देखील दिली. काम वेळेत करा, बक्षीस देऊ अन्यथा कारवाई करु, असा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला. तसेच, येथील नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. याशिवाय, मुख्यमंत्र्यांनी ट्रॅक्टर चालवण्याचाही आनंद घेतला.
#WATCH | At the cleanliness drive event on Juhu Beach, Maharashtra CM Eknath Shinde drives a tractor. pic.twitter.com/leDU2jJLGf
— ANI (@ANI) December 9, 2023
राजधानी मुंबईमध्ये प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. सरकारकडून यासंबंधी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक विभागात व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून आज महापालिकेच्या पाच विभागागातील पाच वॉर्डांमध्ये स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये परिमंडळ ३ मध्ये के पूर्व विभाग, परिमंडळ ४ मध्ये के पश्चिम विभाग, परिमंडळ ५ मध्ये एम पश्चिम विभाग, परिमंडळ ६ मध्ये एन विभाग आणि परिमंडळ ७ मध्ये आर दक्षिण विभागात व्यापक स्तरावर व सखोल, सर्वांगीण स्वच्छता केली जाणार आहे.
पाच विभागांमध्ये मोहीम
- जुहू बीच येथील महात्मा गांधी पुतळा परिसर,
- विलेपार्ले येथील नेहरु रस्ता; शहाजी राजे महानगरपालिका शाळा
- अंधेरी पूर्व येथील गोखले उड्डाणपूलाजवळ
- कांदिवली पूर्व येथील ठाकूर संकुल गेटवर
- घाटकोपर पूर्व येथील रमाबाई नगर, राजावाडी रुग्णालय, राजावाडी उद्यान
- टिळक नगर येथील सह्याद्री क्रीडा मंडळ मैदानजवळ