शिवडी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम, राज्य पुरातत्त्व विभागाची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:22 AM2017-11-20T01:22:11+5:302017-11-20T01:22:28+5:30
मुंबई : जागतिक वारसा दिनाचे निमित्त साधत, मुंबईतील शिवडी किल्ल्यासह राज्यातील विविध किल्ल्यांवर सह्याद्री प्रतिष्ठानने रविवारी संवर्धन मोहीम राबविली.
मुंबई : जागतिक वारसा दिनाचे निमित्त साधत, मुंबईतील शिवडी किल्ल्यासह राज्यातील विविध किल्ल्यांवर सह्याद्री प्रतिष्ठानने रविवारी संवर्धन मोहीम राबविली. राज्य पुरातत्त्व विभागाच्या सहकार्यामुळे या मोहिमेत गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहिमेसह विविध उपक्रम यशस्वीपणे राबविल्याची माहिती प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी दिली.
रघुवीर यांनी सांगितले की, गेल्या काही आठवड्यांपासून शिवडी किल्ल्यावर मुंबई विभागातर्फे सातत्याने स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. जागतिक वारसा दिनाचे निमित्त साधत, पुरातत्त्व विभाग आणि वडाळा पोलिसांनीही रविवारच्या मोहिमेत सहभाग नोंदविला. या मोहिमेदरम्यान किल्ल्यातील प्लॅस्टिक कचरा काढून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. यामध्ये स्थानिकांनीही सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, संरक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाºयांनी या वेळी संवर्धनातही पुढाकार घेतला होता. या मोहिमेचा समारोप पुढील मोहिमेबाबतच्या बैठकीने झाला. मोहिमेमध्ये पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सहसंचालक भा. वि. कुलकर्णी, वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक परशुराम कार्यकर्ते, सहायक पोलीस निरीक्षक डी. बी. बजबळकर यांनी विशेष योगदान दिले. मोहिमेत सामील झालेल्या सर्व दुर्गप्रेमींना वडाळा पोलीस ठाण्यातर्फे चहा, नाश्ता व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
दुर्ग संवर्धनासाठी सरसावलेल्या सह्याद्री प्रतिष्ठानने शिवडी किल्ल्यासह राज्यातील विविध किल्ल्यांवरही संवर्धन मोहीम राबविली. त्यात पुण्यातील कोरीगड, तुंग या किल्ल्यांसह सांगलीचा मच्छींद्रगड, पूर्णगड, रत्नागिरीचा पूर्णगड, लातूरचा औसा किल्ला यांचा समावेश होता. दुर्गप्रेमींनी शिवाजी महाराजांचा हा वारसा असाच जपून ठेवण्याची शपथही घेतली.