Join us

स्वच्छता राखा अवघ्या ३ हजार रुपयांत!

By admin | Published: January 25, 2016 1:38 AM

महापालिकेच्या वतीने मागणीनुसार पुरवण्यात येणाऱ्या फिरत्या शौचालयांसाठी आता केवळ वाहतूक खर्च म्हणजेच तीन हजार रुपये द्यावे लागणार आहेत.

मुंबई : महापालिकेच्या वतीने मागणीनुसार पुरवण्यात येणाऱ्या फिरत्या शौचालयांसाठी आता केवळ वाहतूक खर्च म्हणजेच तीन हजार रुपये द्यावे लागणार आहेत. ‘स्वच्छ मुंबई - स्वच्छ भारत’ या अभियानाचा भाग म्हणून महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशा शौचालयांची सेवा घेणाऱ्यांची आता भाडे आणि अनामत रकमेतून सुटका होणार आहे. सार्वजनिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम अथवा अन्य कार्यक्रमांच्या ठिकाणी येणाऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आणि स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेच्या घन कचरा विभागाच्या वतीने फिरती शौचालये पुरवली जातात. जमणाऱ्या गर्दीला शौचालय शोधण्यासाठी पायपीट करावी लागू नये किंवा त्यांनी परिसर अस्वच्छ करू नये, म्हणून ही सोय असते. त्यासाठी आजवर भाडे, अनामत रक्कम आणि वाहतूक खर्च आकारला जात असे. आता मात्र, केवळ वाहतूक खर्च आकारण्यात येणार आहे. महापालिकेने यासाठी १० आसनी ६० फिरती शौचालये म्हणजेच ६०० शौचकुपे तयार ठेवली आहेत. महत्त्वाचे म्हणजे नागरिकांची मागणी आणि मुंबईत होणारे विविध कार्यक्रम यांचा विचार करत, आणखी १० आसनांची ५० फिरती शौचालये खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महापालिकेच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सामान्य नागरिकांपर्यंत ही सेवा सहज पोहोचेल, असा दावा प्रशासनाचा दावा आहे. (प्रतिनिधी)