महिला बचत गटांचीच पालिकेकडून सफाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 04:17 AM2018-03-11T04:17:01+5:302018-03-11T04:17:01+5:30
महापालिकेतर्फे विभागस्तरावर होत असलेल्या रस्त्यालगतच्या नालेसफाईसाठी यंदापासून आॅनलाइन निविदा मागविण्यात येणार आहेत. याचा फटता गेले दशकभर या नाल्यांच्या सफाईचे काम करणा-या महिला बचत गटांना बसणार आहे.
मुंबई - महापालिकेतर्फे विभागस्तरावर होत असलेल्या रस्त्यालगतच्या नालेसफाईसाठी यंदापासून आॅनलाइन निविदा मागविण्यात येणार आहेत. याचा फटता गेले दशकभर या नाल्यांच्या सफाईचे काम करणा-या महिला बचत गटांना बसणार आहे. परिणामी, प्रत्येक बचत गटाला किमान तीन ते चार लाख रुपयांच्या कामावर पाणी सोडावे लागणार आहे.
पावसाळ्याला जेमतेम तीन महिने उरले असल्याने, नालेसफाईच्या निविदा प्रक्रियेने वेग घेतला आहे. छोटे नाले, रस्त्यालगतचे नाले आणि पर्जन्य पेटिकांसाठी आॅनलाइन निविदा प्रक्रियेतून ठेकेदार नेमण्यात येणार आहेत. पूर्व व पश्चिम उपनगरातील छोट्या नाल्यांच्या सफाईला स्थायी समितीने मंजुरीदेखील दिली आहे. त्यानुसार, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी नुकतीच ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पावसाळ्यात मुख्य नाल्यांबरोबरच रस्त्याच्या बाजूला असलेल्या पर्जन्य पेटिकांचीही सफाई केली जाते. ही सफाई गेल्या काही वर्षांपासून महिला बचत गटांमार्फत केली जात होती. या माध्यमातून त्या महिला बचत गटांच्या हाताला काम मिळण्यासोबतच त्यांना तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते.
मात्र, या वर्षी पुन्हा हे काम मिळावे, यासाठी अर्ज करणाºया महिला बचत गटांना प्रभाग कार्यालयातून नकार मिळाला. अचानक अशा पद्धतीने महापालिकेने कंत्राटातून बाहेर केल्यामुळे महिला बचत गट हवालदिल झाले आहेत.
महिला बचत गटांना
दुसरा धक्का
शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्याचे कंत्राट यापूर्वी बचत गटांकडेच होते. मात्र, हे काम त्यांच्या हातून काढून घेण्यात आले. त्यानंतर, आता नालेसफाईच्या कामातूनही त्यांना हद्दपार करण्यात आले आहे. गरीब कुटुंबातील महिलांनी एकत्र येऊन हे बचत
गट तयार केले आहेत. त्यामुळे महिला बचत गटाच्या सेवा खंडित करून, ठेकेदारांना नेमण्याच्या निर्णयाचा फटका गरीब कुटुंबांना बसणार आहे.