मुंबई - सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाऱ्या नागरिकांचे सर्वच बाजूने नाकाबंदी करण्यासाठी महापालिकेने आता क्लीन-अप मार्शलही रस्त्यावर उतरवले आहेत. रस्त्यावर थुंकणारे व मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर या मार्शलची नजर असणार आहे. गेल्याच आठवड्यात पालिकेने कारवाईसाठी वाहतूक पोलीस व पोलिसांची मदत घेण्यास सुरुवात केली. तसेच मुंबईतील रेल्वे स्थानकांबाहेर, बस थांबा, बाजारपेठ अशा सार्वजनिक ठिकाणे मार्शलचा खडा पहारा असणार आहे.
कोरोनापासून बचावासाठी अन्य उपाय योजनांबरोबरच तोंडाला मास्क लावणे अत्यंत आवश्यक झाले आहे. मात्र वारंवार सूचना करून व दंडात्मक कारवाईनंतरही अनेक ठिकाणी मुंबईकर मास्क न लावता फिरताना दिसून आले आहेत. त्यामुळे बस, टॅक्सी, कार्यालय आदी सार्वजनिक ठिकाणी विना मास्क प्रवेश नाकारण्याचे ताकीद पालिकेने संबंधितांना दिली आहे. तसेच दोनशे रुपये दंडाची रक्कम दुप्पट करून चारशे रुपये करण्याचा पालिका प्रशासनाचा विचार सुरू आहे.
मास्क न लावणाऱ्यांविरोधात दंड वसूल करण्यासाठी मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. पहिला गुन्हा गोवंडी येथे विनामास्क फिरणाऱ्या तरुणावर दाखल करण्यात आला आहे. मात्र कारवाईसाठी महापालिकेला अन्य विभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार टाकावा लागत आहे. त्यामुळे मुंबईतील २४ प्रशासकीय विभागातील सार्वजनिक ठिकाणी तब्बल ६०० मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे. मास्क न लावणाऱ्याबरोबरच रस्त्यावर थुंकणाऱ्यांवरही हे मार्शल कारवाई करणार आहेत.
* दुकानदार, विक्रेते व कर्मचारी, प्रभात फेरीला जाणारे नागरिक ‘विनामास्क’ आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
* मास्क न लावणाऱ्यांना टॅक्सी, बस, कार्यालय, आस्थापना, सोसायटी अशा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारण्यात येत आहे.
* आतापर्यंत ४० हजार लोकांकडून एक कोटी पाच लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
* विनामास्क फिरणाऱ्या दररोज २० हजार लोकांना दंड करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे.