लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चिपी विमानतळावरून विमान वाहतुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. नागरी उड्डाण संचालनालयाने (डीजीसीए) ‘आयआरबी’ सिंधुदुर्ग विमानतळ कंपनीला त्याबाबतचा परवाना (एरोड्रोम लायसन्स) जारी केला असून, त्यांना आता विमान कंपन्या आणि प्रवाशांकरिता सुविधा उपलब्ध करून देता येतील.
डीजीसीएच्या परवान्यात नमूद केल्यानुसार, चिपी विमानतळावरून नियमितपणे विमानांचे आगमन आणि प्रस्थान करण्यास मंजुरी देण्यात येत आहे. विमान प्रचलन आणि धावपट्टी वापरासंबंधीच्या सर्व अटी आणि शर्ती संबंधितास लागू राहतील. एरोड्रोम मॅन्युअलमध्ये सूचित केल्यानुसार नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.
चिपी विमानतळाच्या उभारणीसाठी जवळपास ८०० कोटी रुपये खर्च झाला असून, बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर ‘आयआरबी’ सिंधुदुर्ग विमानतळ कंपनीला तो ९० वर्षांच्या करारावर देण्यात आला आहे. दक्षिण कोकणातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. पश्चिम महाराष्ट्र, दक्षिणेकडील राज्ये, मुंबई आणि उर्वरित विमानतळांना कोकणाशी हवाई मार्गाने जोडण्याच्या हेतूने हे विमानतळ तयार करण्यात आले आहे.
केवळ प्रवासी वाहतूकच नव्हे, तर पश्चिम क्षेत्राचे कार्गो हब बनविण्याच्या दृष्टीने या विमानतळाची आखणी करण्यात आली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणांना मालवाहतुकीने थेट जोडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करण्याचा उद्देशही यामागे आहे. हवाई वाहतूक क्षेत्राच्या भविष्यकालीन गरजा ओळखून या हरित विमानतळाची उभारणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
.......
चिपी विमानतळावरून विमान प्रचलन करण्यासाठी परवाना मिळाल्याने आम्ही चालू वर्षात आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. या कामात सहकार्य करणारे सर्व भागधारक आणि प्राधिकरणांचे अत्यंत आभार. प्रवासी आणि विमान कंपन्यांसाठी सुविधा सुरू करण्यास आम्ही उत्सुक आहोत.
- वीरेंद्र म्हैसकर, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, आयआरबी सिंधुदुर्ग विमानतळ
.....
विमान उड्डाण कधीपासून?
येत्या ९ ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून नियमित विमान उड्डाण होणार आहे. हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह प्रमुख नेते आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विमानतळाचे उद्घाटन पार पडेल.