पाकिस्तानमधून 'त्या' दोघींना भारतात आणण्याचा मार्ग मोकळा
By मनोहर कुंभेजकर | Published: July 29, 2023 05:47 PM2023-07-29T17:47:08+5:302023-07-29T17:47:18+5:30
आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नांना यश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पाकिस्तानच्या कराचीमध्ये असलेल्या आपल्या भाच्यांना भारतात आणण्यासाठी महिनोनमहिने प्रयत्न करणाऱ्या वयोवृद्ध मामाला कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नामुळे दिलासा मिळाला आहे. त्यांना भारतात आणण्यासाठी आवश्यक असलेला 'व्हिसा' मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हेमराज सोनी असे त्या मामाचे नाव. सोनी हे मालाड पूर्वमध्ये राहतात. त्यांच्या भाच्या गीता आणि रीटा सध्या काराचीमध्ये आहेत.
या दोघींना भारतात आणण्यासाठी त्यांचे मामा हेमराज सोनी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत होते. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. अखेर त्यांनी आमदार अतुल भातखळकर यांची भेट घेतली.त्यांनी समस्या समजावून घेतली. आवश्यक ती सर्व प्रशासकीय मदत त्यांनी सोनी यांना केली. त्यानंतर आता सोनी यांच्या भाच्या भारतात येण्यासाठी आवश्यक असलेला 'व्हिसा' मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यानंतर सोनी यांनी आमदार भातखळकर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.