ऑरेंज गेट-मरिन ड्राइव्ह भुयारी मार्गातील विघ्न दूर; १.९६ हेक्टर जागा मिळण्याचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 10:25 AM2024-06-07T10:25:16+5:302024-06-07T10:28:12+5:30
पूर्व मुक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांना थेट पश्चिमेला मरिन ड्राइव्ह येथे पोहोचण्यासाठी शहरातील कोंडीतून मार्गक्रमण करावे लागते.
मुंबई : पूर्व मुक्त मार्ग मरिन ड्राइव्ह येथे सागरी किनारा मार्गाला जोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या ऑरेंज गेट-मरिन ड्राइव्ह भुयारी मार्ग प्रकल्पासाठी मुंबई पोर्ट ऑथोरिटीने (एमबीपीए) ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) या मार्गाच्या शाफ्ट उभारणीसाठी एमबीपीएची जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पूर्व मुक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांना थेट पश्चिमेला मरिन ड्राइव्ह येथे पोहोचण्यासाठी शहरातील कोंडीतून मार्गक्रमण करावे लागते. त्यात दक्षिण मुंबईतील रस्ते निमुळते असल्याने वाहतूक कोंडी होते. हा प्रश्न सोडविण्यासाठी पी डिमेलो रस्त्यावरील ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह असा भुयारी मार्ग उभारला जात आहे. यासाठी या प्रकल्पात दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी दोन बोगदे उभारले जाणार असून, यातील एका बोगद्याची लांबी ४.२७ किमी, तर दुसऱ्या बोगद्याची लांबी २.२४ मीटर इतकी असेल. या प्रत्येक बोगद्यांचा व्यास ११ मीटर एवढा असून, त्यामध्ये ३.२ मीटर रुंदीच्या दोन मार्गिका तर एक आपत्कालीन मार्गिका असेल. पोहोच मार्गांसह या रस्त्याची लांबी ९.२३ किमी असेल. या बोगद्यात उतरण्यासाठी १९० मीटरचा पोहोचमार्ग उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी एमएमआरडीएने लार्सन ॲण्ड टुब्रो या कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे.
प्रकल्पाचा खर्च- ७,७६५ कोटी रु.
एकूण लांबी- ९.२३ किमी
दोन ट्विन टनेलांची एकत्रित लांबी - ६.५२ किमी
लवकरच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ-
१) एमएमआरडीएला या प्रकल्पाच्या कामासाठी पी डिमेलो रस्त्याजवळ शाफ्ट उभारावा लागणार आहे. या शाफ्टमधून टनेल बोरिंग मशीन आणि भुयारीकरणासाठी लागणारी आवश्यक मशिनरी भूगर्भात सोडली जाणार आहे.
२) मात्र त्यासाठी एमबीपीएच्या हद्दीतील १.९६ हेक्टर जागेची गरज एमएमआरडीएला आहे. त्यातील १.२५ हेक्टर जागा तात्पुरत्या स्वरूपात, तर ०.७१ हेक्टर जागा कायमस्वरूपी हवी आहे. ही जागा देण्यास एमबीपीएने मंजुरी दिली असून, काम सुरू करण्यासाठी एमएमआरडीएला ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे.
३) त्यामुळे या भुयारी मार्गाच्या उभारणीला आता सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या काही महिन्यांत या भुयारीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.