दी म्युनिसिपल बँक घोटाळ्यातील लिपिकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 06:26 AM2019-12-18T06:26:55+5:302019-12-18T06:27:02+5:30
लोकमत दणका : पोलीस कोठडीत रवानगी; निकमच्या चौकशीतून उलगडणार अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग
मुंबई : दी म्युनिसिपल को-आॅप. बँकेच्या मुलुंड शाखेतील साडेतीन कोटींचा घोटाळा लोकमतने उघडकीस आणल्यानंतर, अखेर मुलुंड पोलिसांनी लिपिक मिलिंद निकमला अटक करत, मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
निकम गेल्या दीड वर्षापासून दी म्युनिसिपल बँकेच्या मुलुंडच्या शाखेत कार्यरत होता. याच दरम्यान त्याने मित्र-मैत्रिणी, पत्नी तसेच अन्य बनावट खाती तयार करून पैसे ट्रान्सफर केले. यात ३ कोटी ४९ लाख ६० हजार रुपयांवर त्याने डल्ला मारला. शाखा अधिकाºयाच्या पासवर्डचा वापर करून हे पैसे ट्रान्सफर करण्यात आले.
यासंदर्भात ११ डिसेंबर रोजी ‘मुंबई महापालिकेच्या दी म्युनिसिपल बँकेत कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा’ असे वृत्त प्रसिद्ध करून लोकमतने या घोटाळ्याला वाचा फोडली. त्यानंतर सातत्याने याचा पाठपुरावा केला.
निकमने यापूर्वी सायन शाखेत काम केले आहे. त्यामुळे त्याच्या सायन शाखेतील व्यवहारांची चौकशी होण्याची मागणी जोर धरू लागली. याच दरम्यान महिला संचालकांच्या नावाने मेसेज व्हायरल झाले. त्यात बँकेतील पैसे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. लोकमतने या घोटाळ्याला वाचा फोडताच पदसिद्ध अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी तत्काळ सर्व २२ शाखांमधील कार्यालयीन खर्चविषयक खाते बंद केले. तसेच पासवर्ड पद्धत टप्पेनिहाय बंद करत बायोमेट्रिक आॅथोरायझेशन पद्धत अमलात आणण्याबाबत निर्देश दिले.
या घोटाळ्यात तो एकटाच आहे की अन्य कुणाचा यात सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. त्याच्याकडून फसवणुकीची रक्कमही वसूल करणे बाकी आहे. निकमच्या अटकेच्या वृत्ताला साहाय्यक पोलीस आयुक्त पांडुरंग शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.
महिला संचालकाची आॅडिओ क्लिप व्हायरल
महिला संचालकाच्या व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लिपमध्ये त्यांनी मुलुंड घोटाळ्याविषयी बोलताना यात सर्व कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे पोलीस याचा कसा तपास करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.