प्राची सोनवणे, नवी मुंबईनर्सरीपासून ते महाविद्यालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांच्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. नामांकित संस्थेत प्रवेश मिळविण्यासाठी त्या ठिकाणी सर्वाधिक वर्चस्व असलेल्या राजकीय नेत्यांचा आधार घेतला जात आहे. यामुळे जास्त पर्सेंटाईलचे विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत राहतात आणि कमी गुण असलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरतात.शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच अॅडमिशनने पालकांचा घाम गाळला आहे. शहरातील नामांकित शाळा, महाविद्यालयांत प्रवेश अर्जासाठी पालकांनी पहाटेपासून रांगा लावल्या आहेत. परिसरातील नेतेमंडळी, संस्थेचे अधिकारी, प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील कर्मचारीवर्ग यांच्या बळावर विद्यार्थ्यांच्या अॅडमिशनसाठी पालकांचे प्रयत्न सुरू होते. नामांकित संस्थेत प्रवेश हवा असल्यास प्रवेश शुल्कापेक्षा जास्त पैशांची मागणी या संस्थांकडून केली जाते. नर्सरीच्या प्रवेशासाठीही डोनेशनची मागणी केली जाते. मॅनेजमेंट कोटा, रिझर्व्हेशन कोटा यांच्या नावाखाली पालकांकडून भरसाट पैसा उकळण्यात येतो. यंदाच्या १० वी, १२ वीच्या निकालाचा टक्का वाढला आहे. असे असतानाही काही महाविद्यालयांमध्ये ठरावीक सीट्स आधीच फुल्ल दाखविले जात आहेत. अॅडमिशनच्या नावाखाली राजकीय नेते, संस्थेच्या अधिकाऱ्यांकडून हजारो रुपयांची मागणी केली जाते आहे. एकीकडे नव्वद टक्के मिळविणारे विद्यार्थी प्रवेशासाठी संस्थेच्या बाहेर रांगा लावून उभे आहेत, तर त्याच ठिकाणी राजकीय नेत्याच्या वशिलेबाजीने काही क्षणातच अॅडमिशन मिळविणारे कमी गुणांचे विद्यार्थी मात्र निर्धास्तपणे फिरत आहेत. प्रवेशाच्या या स्पर्धेत हुशार मुले नापास झाली आहेत. चांगले गुण मिळवूनही प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थी हतबल झाले आहेत.
हुशार विद्यार्थी महाविद्यालयीन प्रवेशात ‘नापास’
By admin | Published: June 12, 2015 10:38 PM