मुंबई : स्मार्टफोन्स आणि गॅझेट्समुळे अवघे विश्व हाताच्या मुठीत सामावू लागले. याच विचाराने निसर्गाची किमया जगाच्या कानाकोप-यात पोहोचविण्याच्या उद्देशाने युवराज गुर्जर यांच्या संकल्पनेतून ‘आय लव्ह बटरफ्लाय’ या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपच्या माध्यमातून तब्बल १५३ फुलपाखरांच्या रंग, जात आणि वैशिष्ट्यांची माहिती केवळ एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.गेल्या काही वर्षांमध्ये ‘बटरफ्लाय पार्क’ ही संकल्पना रुजू लागली आहे. मात्र एखाद्या फुलपाखराचा अभ्यास निसर्गाच्या सान्निध्यात किंवा अशा पार्कमध्ये करणे कठीण ठरते. याचाच विचार करुन जगभरातील निसर्ग आणि पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या संशोधक, निसर्गप्रेमी आणि विद्यार्थ्यांना फुलपाखरांची माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबई आणि ठाणे परिसरातील फुलपाखरांचा अभ्यास करुन हे अॅप तयार करण्यात आले आहे. त्यासाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागल्याचे युवराज सांगतात. या अॅपमध्ये विविध जातींच्या फुलपाखरांची माहिती छायाचित्रांसह तसेच ही फुलपाखरे कोणत्या ठिकाणी आढळतात, त्यांची वैशिष्ट्ये याचाही समावेश अॅपमध्ये आहे. (प्रतिनिधी)
फुलपाखरांची माहिती क्लिकवर
By admin | Published: November 04, 2014 1:03 AM