Join us

‘क्लिक हिअर’ला चढला राजकीय रंग, ‘एक्स’वर जुन्या फीचरचा नव्याने वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 12:53 PM

Social Media: लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी अद्याप रस्त्यावर दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. त्यात एक्स (पूर्वाश्रमीचे ट्विटर) हा मंच तरी कसा मागे राहील.

 मुंबई - लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी अद्याप रस्त्यावर दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. त्यात एक्स (पूर्वाश्रमीचे ट्विटर) हा मंच तरी कसा मागे राहील. तर, सध्या एक्स या सोशल मीडिया मंचावर ‘क्लिक हिअर’चा ट्रेण्ड सुरू आहे. वस्तुत: २०१६ साली आलेल्या या अल्टरनेटिव्ह टेक्स्ट फीचरचे (ऑल्ट) अद्ययावत व्हर्जन इलॉन मस्क यांनी आणले. सगळ्याच प्रमुख राजकीय पक्षांनी क्लिक हिअरचा फोटो पोस्ट केला व त्यातून प्रचाराचा संदेश नेटकऱ्यांपर्यंत पोहोचवला आहे. गेली दोन दिवसांपासून क्लिक हिअर हा बाण असलेला फोटो व्हायरल होऊन ट्रेण्डिंगमध्ये आला आहे. राजकीय पक्षांपासून ते अगदी नेते, उमेदवार आणि मतदारांनी क्लिक हिअरचा वापर करत महत्त्वाच्या मुद्यांवर बोट ठेवले आहे.

नेमके काय आहे फीचर?    एक्सवर कोणताही फोटो पोस्ट करत असताना त्या फोटोत नेमके काय आहे हे सांगता यावे यासाठी ऑल्टची सुविधा देण्यात आली आहे.    ऑल्टसाठी एक हजार अक्षरांची मर्यादा घालून देण्यात आलेली असून याचा वापर करून तुमच्या पोस्टचा आकार न वाढवता फोटोचे व्यवस्थित वर्णन करता येते.     एक्सवर फोटो पोस्ट करत असताना ऑल्ट टेक्स्ट देता येतो.     एक्सवर फोटो अपलोड करत असताना तिथे ऑल्टचा पर्याय दिसतो. त्यावर क्लिक केले की फोटोच्या संदर्भातला कोणताही मजकूर तिथे लिहू शकता.     त्यानंतर हा मजकूर फोटोसोबत जोडला जातो. फोटो पोस्ट केल्यानंतर वापरकर्त्याने ऑल्टवर क्लिक केले तरच त्याला तो मजकूर किंवा संदेश वाचता येईल.

कोणाकडून वापर?सुरुवातीला भाजपने क्लिक हिअरचा वापर करत पोस्ट शेअर केली. त्यात ऑल्ट या पर्यायवर क्लिक करताच क्षणी ‘फिर एक बार मोदी सरकार’ असा संदेश येत होता. त्यानंतर नेटीझन्सने या पोस्टच्या धर्तीवर क्लिक हिअर अंतर्गत वेगवेगळ्या पोस्ट्स शेअर करत हा ट्रेण्ड केला. 

त्यात मग काँग्रेस, आम आदमी पार्टी, शिवसेना अशा विविध पक्षांकडून आगामी लोकसभा निवडणुकींबाबत सत्ताधाऱ्यांच्या विरोधी भूमिका अधोरेखित करण्यासाठी क्लिक ट्रेण्ड वापरण्यात आला. तर, नेटीझन्सनेही सामान्य मतदारांचा आवाज मांडण्यासाठी क्लिक हिअरमध्ये आपल्या मागण्या मांडल्या आहेत, यालाही सर्व देशभरातील नेटीझन्सचा प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :सोशल मीडियालोकसभा निवडणूक २०२४