मुंबई : पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण प्रकल्प व प्रचालन, पाणीपुरवठा प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापन खात्यांचा पर्यावरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंध येतो. मुंबईच्या क्लायमेट ॲक्शन प्लॅन (एमकॅप)मध्ये नमूद केलेल्या समस्या या पालिकेच्या विविध विभागांशी संबंधित आहेत. त्यामुळे या विभागांकडून हाती घेतले जाणारे प्रकल्प किंवा राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन आणि प्राधान्य देण्यासाठी पालिकेने २०२४-२५ या वर्षासाठी आपला पहिला वातावरणीय अर्थसंकल्प सादर केला असून, त्यात सुचविलेल्या उपाययोजनांसाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
क्लायमेट ॲक्शन प्लॅनमधील नोंदीनुसार, गेल्या काही वर्षांपासून मुंबईत अतिवृष्टीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुंबईतील ३५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ही पालिकेने पूरप्रवण म्हणून नोंदविलेल्या ठिकाणांच्या २५० मीटर अंतराच्या आत राहते. शिवाय हवेतील पीएम २.५ आणि पीएम १० या धूलिकणांचे वाढते प्रमाण विविध उपाययोजनांद्वारे कमी करणे आवश्यक आहे. नायट्रोजन डायऑक्साइड हा मुंबईतील एक प्रमुख प्रदूषक आहे. मात्र, २०१९ पर्यंत सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड आणि अमोनियाची सरासरी पातळी वाढत आहे.
२८७ ठिकाणे भूस्खलनप्रवण-
१) मुंबईतील २८७ ठिकाणे ही भूस्खलनप्रवण आहेत, त्यापैकी २०९ ठिकाणे ही अस्थिर बांधकामे व सामाजिकदृष्ट्या असुरक्षित असलेल्या वस्त्यांमधील आहेत.
२) या विविध प्रमुख जोखमीपासून मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी क्लायमेट ॲक्शन प्लॅन पालिकेकडून राबविण्यात येणार असून, हा अर्थसंकल्प याचा एक महत्त्वाचा भाग आहे.
३) ॲक्शन प्लॅननुसार मुंबईसाठी २०३० पर्यंत २७ टक्के आणि २०५० पर्यंत ७२ टक्के उत्सर्जन कमी होईल, असे लक्ष्य निश्चित केले आहे. अर्थसंकल्पाच्या मदतीने टप्प्याटप्प्याने हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे आणि ‘एमकॅप’ची प्रगती मोजण्यासाठी वातावरण परिणाम विश्लेषण बळकट करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
४) पालिका प्रशासनाकडून विविध कामे, तसेच प्रकल्प राबविताना पर्यावरणाच्या हिताचा प्राधान्याने विचार केला जाईल. त्यादृष्टीने कामांना प्राधान्य दिले जाईल.- मीनेश पिंपळे, उपआयुक्त, पालिका पर्यावरण विभाग.
५) जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने पहिला ‘वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल’ प्रकाशित केला आहे. पर्यावरणाशी सुसंगत राहून विविध पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे महत्त्वाचे आहे. त्या दिशेने पालिकेचे हे पहिले पाऊल आहे.- अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई पालिका
अहवाल प्रसिद्ध करणारे जगातील चौथे शहर-
१) वातावरणीय अहवाल प्रसिद्ध करणारे मुंबई हे ऑस्लो, लंडन आणि न्यूयॉर्कनंतर आता जगातील चौथे शहर बनले आहे.
२) सर्वांत जास्त वाटा हा नागरी क्षेत्र पूर आणि जल संसाधन व्यवस्थापन या क्षेत्रासाठी आहे. यामध्ये पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण प्रकल्प व प्रचालन, मुंबई मलनिःसारण प्रकल्प, पाणीपुरवठा प्रकल्प या खात्यांचा आणि घनकचरा व्यवस्थापन खात्यातील स्वच्छता संबंधित उपक्रमांचा समावेश होतो.