वातावरणातील बदलाचा ताप, मुंबईत तापमानवाढीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 02:11 AM2018-03-27T02:11:19+5:302018-03-27T02:11:19+5:30

वातावरणात बदल झाला आहे, आशावेळी काय कराल आणि काय काय नाही

Climate change fever, Mumbai's temperature rises | वातावरणातील बदलाचा ताप, मुंबईत तापमानवाढीचा फटका

वातावरणातील बदलाचा ताप, मुंबईत तापमानवाढीचा फटका

googlenewsNext

मुंबई : मुंबईचा पारा चढल्याने मुंबईकरांना ‘ताप’ झाल्याचे दिसून येत आहे. सात वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबईच्या तापमानाने चाळीशी ओलांडल्याने मुंबईकरांवर आजाराचे संकट कोसळले आहे. डोकेदुखी, शरीरातील पाणी कमी होणे, उष्माघात आणि खोकल्याने मुंबईकर हैराण झाले असून, शहर-उपनगरातील डॉक्टरांकडे रुग्णांची रीघ दिसून येत आहे.

मुंबईच्या वातावरणात बदल होत असल्याने, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखीने मुंबईकर आजारी पडले आहेत. डॉक्टरांचे दवाखाने रुग्णांनी भरून गेले आहेत. बऱ्याच रुग्णांना तासन्तास ‘वेटिंग’ केल्यानंतर डॉक्टरांची भेट होत आहे. या आजारपणाचे परिणाम थेट शाळांपासून कार्यालयातील उपस्थितीवर दिसत आहेत. या सततच्या बदलाचा परिणाम आरोग्यावर होत आहे. त्यामुळे पालिकेच्या प्रत्येक रुग्णालयात सर्दी, खोकला आणि त्याचसोबत डेंग्यू, मलेरिया, डायरिया, टायफॉइड या आजारांच्या रुग्णांची गर्दी प्रचंड वाढली आहे.

वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारांनी उचल घेऊन मुंबईकरांना ताप द्यायला सुरुवात केली. साथीच्या तापामुळे मुंबईकर अक्षरश: हैराण झालेले असताना, हिवताप, गॅस्ट्रो आणि टायफॉइड यांसारख्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सध्या हवामानातील बदल हे दिवसा आणि रात्री परस्परविरोधी आहे. गेल्या १५ दिवसांपासून दिवसाचे तापमान हे चाळीशीच्या घरात; तर रात्रीही यात चढ-उतार होताना दिसतो. या तापमानातील तीव्र बदल वातावरणातील विषाणूंच्या वाढीसाठी पोषक ठरते.

यामुळे विषाणूंची वाढ वेगाने होत आहे. म्हणून सध्या प्रत्येक घरातील कोणी ना कोणी आजारी पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वातावरणात हे तीव्र बदल जाणवत आहेत.मागील वर्षीपेक्षा यंदाच्या उन्हाळ्याला थोडी उशिरा सुरुवात झाली असली, तरी उन्हाच्या झळांचे चटके हळूहळू वाढू लागले आहेत. त्यासाठी सर्वांना खबरदारी घेण्याची आवश्यकता भासू लागली आहे.

शहर-उपनगरातील जनरल प्रॅक्टिशनर्सच्या निरीक्षणानुसार, त्यांच्या दवाखान्यांमध्ये नेहमीपेक्षा २0 ते ३0 टक्के रुग्णांची वाढ झालेली आहे. यापैकी जास्त रुग्ण हे ताप, डोकेदुखी, खोकला, सर्दी, डेंग्यू, न्यूमोनिया, गॅस्ट्रोचे आहेत. या साथी संसर्गजन्य असून, कुटुंबातील एक सदस्य जरी आजारी पडला, तरी त्याची लागण इतरांनादेखील होत आहे.

हे करू नका -

  1. दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात फिरू नका.
  2. मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड, सॉफ्टड्रिंक्स घेऊ नका. त्यामुळे शरीरातील पाण्याची मात्रा कमी होते.
  3. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.
  4. पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.
  5. बर्फाचा गोळा, उघड्यावरचे पेय-पदार्थ खाणे टाळा.


हे करा -

  1. तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या
  2. सौम्य रंगाचे सैल आणि सुती कपडे वापरा
  3. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, बूट, टोपी, मास्क, स्कार्फ वापरा
  4. प्रवास करताना कायम सोबत जास्तीचे पाणी घ्या
  5. आपले घर थंड ठेवा. पडदे झडपा, सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा
  6. डोके, गळा, चेह-यासाठी कायम ओल्या कपड्याचा वापर करा
  7. अशक्त, कमजोरी असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
  8. ओआरएस, घरची लस्सी, तोरणी, लिंबूपाणी, ताक इत्यादी घ्या
  9. प्राणी-पक्ष्यांना सावलीत ठेवा आणि पुरेसे पाणी द्या
  10. फॅनचा वापर करा, थंड पाण्याने आंघोळ करा


स्वत:ला जपा, प्रतिकारशक्ती वाढवा
मुंबई शहर-उपनगरातील वातावरण सध्या प्रचंड बदलतेय. त्यामुळे प्रदूषणाची पातळीही वाढत असल्याने, मुंबईकरांना दम्यापासून ते उष्माघाताचा त्रास होत आहेत. त्यामुळे अशा वेळेस प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पाणी अधिक प्यावे आणि आहार संतुलित राखणे गरजेचे आहे. या दिवसांत प्रत्येकाने शरीर संपूर्ण झाकेल, अशा पद्धतीचे फिकट रंगांचे कपडे वापरावेत. अशा दिवसांत त्वचेच्या माध्यमातूनही शरीराचे अधिक नुकसान होत असते. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेतल्यास, उष्माघातापासून बचाव करता येईल. - डॉ. शिवकुमार उत्तुरे, अध्यक्ष, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद

मूत्रसंस्थेवर परिणाम होण्याचा धोका
उन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यावर नियंत्रण ठेवावे. शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे. पोट बिघडले की, लघवीच्या तक्रारीही वाढतात. लहान मुलांना उन्हाचा फटका लवकर बसतो. त्यामुळे दुपारी त्यांना घराबाहेर पाठवू नये. तप्त उन्हामुळे मूत्रसंस्थेवरही परिणाम होतो. तप्त उन्हापासून मूत्रमार्गाचा संसर्ग होण्याचा धोका संभवतो. पचनशक्ती थोडीशी मंद झालेली असल्यामुळे भूक कमी होते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्यावे.
- डॉ. राजेश सोहनी

Web Title: Climate change fever, Mumbai's temperature rises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.