(२३ मार्च : जागतिक हवामान दिवस)
हवामान बदलाच्या धोक्यासबंधी आजच आपण सावध झालो नाही तर जगाचे प्रचंड नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. हा बदल काही अचानक झाला नसून गेल्या ५० वर्षांपासून मानवाने निसर्गाची केलेली हानी ह्याला कारणीभूत आहे.
.............................
२०व्या शतकात लोकसंख्या वाढ, विजेसाठी कोळश्याचा वापर, अनेक रसायनांचा वापर सुरू झाला. दुसरीकडे शेतीसाठी, उद्योग आणि विकासाच्या कामासाठी पर्यावरणाचा समतोल राखणारी वने मोठ्या प्रमाणावर तोडली गेली. ह्यामुळे जमिनीचे तापमान वाढले, हरित गृहाचा परिणाम झाला, ओझोनला छिद्र पडले, पृथ्वीचे सरासरी तापमान वाढले, ध्रुवावरील बर्फ, ग्लेशिअर्स वितळू लागले, ह्या सर्वांचा परिणाम देशातील जलस्त्रोत, शेती, पर्यावरण आणि हवामानावर झाला.
अत्याधिक हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीला मोठा फटका बसत आहे. उद्योगांना सुद्धा आर्थिक नुकसान सोसावे लागते आहे. आज ह्यामुळे आपली अर्थव्यवस्था ढासळली. पुढेही संकटे वाढणार आहेत म्हणून आजच युद्ध पातळीवर हवामान बदल थांबविला पाहिजे. गेले दशक हे अत्याधिक हवामान बदलाचे झाले असून युरोपमध्ये पूर, ऑस्ट्रेलिया, ॲमेझाॅनमध्ये आगी, थंडीच्या, उष्णतेच्या लाटा वाढू लागल्या आहेत. २०२० हे वर्ष महामारी सोबतच गेल्या १०० वर्षांतील तीव्र हवामान बदलाचे वर्ष ठरले.
हवामान बदल हा शब्द आज सर्व वैज्ञानिक, राजकीय नेते आणि जनसामान्याच्या तोंडी पडलेला परवलीचा शब्द झाला आहे. जगात कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली, पाऊस, ऊन किंवा इतर हवामानात बदल दिसला की क्लायमेट चेंज हा शब्द सर्वांच्या तोंडी सहज येतो. परंतु २५ वर्षांपूर्वी मात्र अनेक बुद्धिवादी लोकसुद्धा ह्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. जागतिक हवामान विभाग आणि भारतीय हवामान विभागांचा १०० वर्षांचा हवामानाचा इतिहास पाहता (१८८६-१९८६) काही अपवाद वर्षे वगळता हवामान स्थिर राहिले होते. हवामान खात्याने ३० वर्षांचा काळ हा हवामान बदलाचा काळ ठरविला आहे. त्यानुसार १९०१ ते १९३० हा कोरडा काळ १९३१ ते १९६० हा ओला काळ. १९६१ ते १९९० हा पुन्हा कोरडा काळ तर १९९१ ते २०२० हा ओला काळ ठरविला आहे. ह्यात भारताने १९ कोरडे तर १३ ओले दुष्काळ पाहिले आहेत. परंतु ह्या सर्व काळात अत्याधिक हवामान बदलाच्या घटना क्वचितच घडल्या. परंतु १९८६ नंतर हरित वायूंच्या उत्सर्जनामुळे आणि तापमान वाढीमुळे हवामान बदलाला सुरुवात झाल्याचे आकडेवारीवरून कळते. अत्याधिक हवामान बदल खऱ्या अर्थाने २०१० ते २०२० ह्या दशकात मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसते.
भारतासहित जगातही सर्वाधिक तापमानवाढीचे आणि नैसर्गिक आपातीचे हेच दशक ठरले. दर नवीन वर्षे हे मागच्या वर्षाचे उच्चांक मोडीत गेले. ह्याच काळात थंडीच्या आणि उष्णतेच्या लहरींनी उच्चांक गाठला. वादळे, महापूर, भूस्खलन अशा घटना घडल्या. आयपीसीसी आणि युएनईपी ह्या संस्थानुसार १९५०पासून पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत गेले. दर दशकात ते ०.०५ ने वाढले आणि आज ते १.० डी.से.च्या पुढे गेले मागील १००० वर्षांत प्रथमताच २०००, २००५, २०१०, २०१३ आणि पुढील प्रत्येक वर्षे अत्याधिक तापमानाचे वर्षे ठरली. २०१९–२०२० हे वर्ष हे गेल्या १०० वर्षांतील सर्वाधिक हवामान बदलाचे आणि नैसर्गिक आपत्तीचे वर्ष ठरले. अगदी ह्या उलट हीच वर्षे सर्वाधिक थंड वर्षे सुद्धा ठरली, असा अभ्यास नासाच्या गोडार्ट इंस्टिट्यूट ऑफ स्पेस स्टडिजने केला आहे.
हवामान बदलाचा मोठा फटका भारतातील नद्या, नाले आणि इतर जलस्त्रोतावर झाला आहे. मराठवाडा, गुजरात, राजस्थान वगळता देशात सर्वत्र ११७० मिमी पावसाची सरासरी आहे. म्हणजे दरमाणसी ६१,००० क्युबिक फुट इतके पाणी वाट्याला येते. परंतु ह्यातील बहुतेक पाणी समुद्रात वाहून जाते. हवामान बदलाचा सर्वाधिक तडाखा मानवाच्या आरोग्यास बसला आहे. रोगराई प्रचंड वाढल्याचे जागतिक आरोग्य संस्थेच्या आकडेवारीवरून कळते. निसर्ग आता आपले विक्राळ रूप धारण करीत असून आपला नाश करू पहात आहे. आजच सावध होऊन आपण निसर्ग संरक्षणाचे उपाय केले नाही तर सर्वनाश निश्चित आहे.
- प्रा. सुरेश चोपणे,
(लेखक ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष आहेत.)