मुंबई - राज्यातील हवानात अचानक बदल झाला असून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. मुंबईतील काही भागांत पावसाच्या रिमझिम सरीही बरल्याची माहिती आहे. डहाणू तालुक्यात रात्री दीड ते दोन वाजल्यापासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सकाळी आठ वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई हवामान विभागाने 9 ते 14 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि 11 डिसेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार, वातावरणात बदल झाल्याचे दिसून येत आहे. आला थंडीचा महिना, चला शेकोटी पेटवा.... म्हणत देशात हिवाळ्यातील गुलाबी थंडीची मजा घेण्यात येत आहे. उबदार कपडे, गरमागरम चहा आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद नागरिक घेत आहेत. मात्र, अचानक वातावरणात बदल झाला असून पावसाचे ढग राज्यातील अनेक भागात जमा झाले आहेत. विशेषत: मुंबई आणि कोकण भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोलापूरमध्येही पावसाने रिमझिम सडा मारला असून दरम्यानच्या काळात हवामान खात्याने यापूर्वीच पावसाची शक्यता वर्तवली होती.
शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांच्या आगमनाला सुरूवात झाली असून या पावसामुळे रब्बी हंगामातील मिरची, भाजीपाला लागवड तसेच सुकी मच्छी, ताडी, गवत व्यापाराला मोठा फटका बसणार आहे. कृषी विज्ञान केंद्राने कृषी सल्ल्याद्वारे चिकू, आंबा, भाजीपाला पिके तसेच पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.