Join us  

स्पायडरमॅनप्रमाणे इमारतीवर चढून करायचे चोऱ्या; सांताक्रुझ पोलिसांकडून दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 3:26 PM

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राहुल सदाशिव मुदानी (२०) आणि सनी चाँद पवार (२३) अशी असून ते अंधेरी पश्चिमेच्या आझादनगर आणि डी. एन. नगर परिसरातील राहणारे आहेत. 

मुंबई : स्पायडरमॅनप्रमाणे इमारतीच्या पाइपावरून चढत खिडकीतून घरात प्रवेश करायचे आणि त्यानंतर लाखोंचा मुद्देमाल घेऊन लंपास व्हायचे. अशा दोन सराईतांना सांताक्रुझ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राहुल सदाशिव मुदानी (२०) आणि सनी चाँद पवार (२३) अशी असून ते अंधेरी पश्चिमेच्या आझादनगर आणि डी. एन. नगर परिसरातील राहणारे आहेत. हे दोघे नालासफाई आणि कचरा वेचण्याच्या बहाण्याने आधी रेकी करायचे आणि त्यानंतर त्या ठिकाणी चोरी करायचे. सांताक्रुझ पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ते ५ मे दरम्यान तक्रारदार यांच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये अनोळखी व्यक्तींनी बिल्डिंग डक्टच्या पाइपावरून चढत घरातील बेडरूमच्या टाॅयलेट मधील बंद खिडकीची काच तोडली. त्यानंतर बंद घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाट, ड्रेसिंग टेबल, मंदिरातील फर्निचरचे कपाटात ठेवलेले चांदीचे दागिने, वस्तूंची चोरी आणि दीड लाख रोख घेऊन गेले. त्यानुसार अनोळखी चोराच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली. त्यांची अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

दोघांचा गाशा गुंडाळलापोलिस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धनंजय आव्हाड तसेच सहायक फौजदार मेस्त्री, हवालदार नेताजी कांबळे, जुबेर सालदुरकर, शिपाई राहुल परब व भटू महाजन या पथकाने मिळून गुन्ह्याच्या घटनास्थळाजवळच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच तांत्रिक बाजू पडताळत आरोपींची माहिती मिळवत आरोपींचा फोटो मिळवून या परिसरामध्ये त्यांचा पत्ता शोधत दोघांचा गाशा गुंडाळला. 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिसचोर